नव्या वर्षांतले भविष्य जाणून घेण्याचा कल वाढला

नव्या वर्षांचे जल्लोषात आणि टेचात स्वागत करण्यासाठी मुंबईकर जय्यत तयारी करत असताना ज्योतिषी आणि भविष्यवेत्त्यांकडे गर्दी वाढत आहे. २०१६ हे वर्ष कसे जाईल याचे कुतूहल आणि एक प्रकारची अनामिक भीती नकारात्मक विचारांना घट्ट धरून बसल्याने अनेक जण मार्गदर्शन म्हणून ज्योतिषशास्त्राची मदत घेत आहेत. यामुळे गेल्या महिन्याभरात शहरातील अनेक नामांकित ज्योतिषी मंडळींच्या डायऱ्या तारखांनी फुल्ल झाल्या आहेत. यात हस्तसामुद्रिक ५०० ते १००० रुपये, तर टॅरेट कार्ड पाहून भविष्य सांगणारी मंडळी १२०० ते १५०० रुपये आकारत आहेत.

शहराच्या दादर, माटुंगा, विलेपाल्रे, भांडुप, घाटकोपर, बोरिवली, दहिसर आदी भागांत अनेक प्रसिद्ध ज्योतिषांची कार्यालये आहेत.

एकविसाव्या शतकातला जगण्याचा वाढता संघर्ष, जीवघेणा वेग, ढासळती कौटुंबिक मूल्ये, वाढती गुन्हेगारी, बॉम्बस्फोट, हल्ले आणि दहशतवाद आदींमुळे प्रत्येक क्षणाला, प्रसंगाला सामोरे जाताना लोकांच्या मनात सतत नकारात्मक विचारांसह अज्ञाताची भीती छळत असते. परिणामी उद्योगधंदा, नोकरी, विवाह आणि शिक्षण यांकडे त्याच नजरेतून पाहिले जाते. यावर ज्योतिषशास्त्रामुळे आत्मविश्वास आणि दिलासा मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत नव्या वर्षांचे भविष्य जाणून घेण्याचा कल वाढत असल्याचे सामाजिक विषयाचे अभ्यासक स्वप्निल गोसावी यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील अनेक उच्चभ्रू टॉवर्समध्ये टॅरेट कार्ड पाहून भविष्य सांगणाऱ्या अनेक ज्योतिषांना ३१ डिसेंबरसाठी खास बोलावण्यात येते. यात त्या दिवशी ही मंडळी सोसायटीतील रहिवाशांना नव्या वर्षांच्या पेटाऱ्यात काय दडलंय हे सांगतात. यंदाही हा ‘सिलसिला’ कायम आहे. गेल्या काही वर्षांत टीव्ही वाहिन्यांमुळे ज्योतिषी मंडळीची लोकप्रियता वाढत असल्याने भविष्यकथन हे ३१ डिसेंबरच्या पार्टीचे आकर्षण ठरत असल्याचे गोसावी म्हणाले.

तर दुसरीकडे खगोलशास्त्रातल्या नऊ ग्रहांच्या आधारावर असलेले ज्योतिषशास्त्र आणि त्याच जोडीला संख्याशास्त्र यांची सांगड घालून भविष्य वर्तवण्याची प्रथाही लोकप्रिय ठरत आहे.

यात जानेवारी ते अगदी डिसेंबपर्यंत बारा महिने कसे जाणार? त्यात काय करणे अपेक्षित आहे? कोणती तारीख शुभ आणि कोणती अशुभ? कोणता रंग फलदायी यादींची माहिती लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.

आशादायी निष्कर्षांसह संकटांची पूर्वकल्पना लोकांना मिळत असल्याने संकटावर मात करण्यासाठी बुद्धी तयार असल्याने लोकही समाधानी होऊन परतत असल्याची भावना रामचंद्र नाईक यांनी व्यक्त केली, तर नव्या वर्षांत ‘लकी नंबर’नुसार घर खरेदी करण्यासाठी ज्योतिष्यशास्त्रांची मदत घेत असल्याचे कुणाल माईणकर यांनी सांगितले.

चित्रपट आणि मालिकांमधील सेलिब्रेटी मंडळींना संख्याशास्त्राचे खास आकर्षण आहे. वाहनांचे आणि भ्रमणध्वनीचे ‘भाग्यवान’ क्रमांक घेण्याचे नटनटय़ांमध्ये अहमहमिका लागल्या आहेत. तसेच िहदी चित्रपटसृष्टीतील बडय़ा कलावंतांमध्ये चित्रपट कोणत्या महिन्यात प्रसिद्ध करावे? चित्रपटाचे नाव कोणत्या अक्षराने असावे? कोणती अभिनेत्री व कोणता अभिनेता तुम्हाला यश देईल? यंदा चित्रपट प्रसिद्ध करणे फलदायी ठरेल का? कोणता रंग सुखदायी ठरेल आदींची माहिती घेण्यासाठी सेलिब्रेटी भेटत असल्याचे एका विख्यात ज्योतिषींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

निर्भय आणि सकारात्मक जगण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे मार्गदर्शन उपयोगी ठरू शकते. त्यामुळे लोक ज्योतिषशास्त्राकडे वळत आहेत. चार महिन्यांपासून लोक भेटीसाठी तारखा नोंदवत आहेत. गेल्या काही वर्षांत नवे वर्ष कसे जाणार हे जाणून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

मनोहर जंगम, ज्योतिषी

नव्या वर्षभरातील भविष्य वर्तवणारी पुस्तकांची मागणी दरवर्षी वाढत असते. यंदाही ही मागणी २० ते २५ टक्क्यांनी वाढली आहे. या पुस्तकांच्या किमती अगदी १० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत जातात.

अनिकेत तेंडुलकर, आयडियल बुक डेपो

Story img Loader