मुंबई : मुंबई विद्यापीठाची पुढील वर्षांची अर्थसंकल्पीय बैठकही पूर्ण अधिसभेविना होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा जाहीर केले असून २१ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक होणार आहे.
गेली जवळपास दोन वर्षे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठका या निवडून आलेल्या विविध गटांच्या प्रतिनिधींशिवाय झाल्या. यंदाची अधिसभेची ऑक्टोबरमधील बैठक आणि मार्चमध्ये होणारी अर्थसंकल्पीय बैठकही पदवीधर प्रतिनिधींशिवायच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आहे. नोंदणीकृत पदवीधर गटाच्या दहा जागांसाठी २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. तर बुधवार, २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी अंतिम मतदारयादीत त्रुटी असल्याचा आरोप केल्यामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर अॅड. सागर देवरे यांनी स्थगितीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या शिफारशीनंतर मुंबई विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषदेची बैठक घेऊन नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निव्वळ वेळकाढूपणा आणि निवडणूक लांबणीवर ढकलण्याचा निर्णय असून जुनी मतदार नोंदणी ग्राह्य धरावी, अशी आग्रही मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली होती. नवीन मतदार नोंदणीच्या नियमावलीनुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व पदवीधरांना पुन्हा नव्याने मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. त्यामुळे या आधी मोठय़ा प्रमाणात पदवीधरांची मतदार म्हणून नावनोंदणी केलेल्या विविध विद्यार्थी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा >>>महापालिकेच्या अधिकाऱयांना मारहाण : भाजप आमदार तामिळ सेल्वन यांच्यासह पाचजणांना सहा महिन्यांचा कारावास
मतदार नोंदणी सुरू
नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी सोमवारपासून मंतदार नोंदणी सुरू झाली असून गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पदवीधरांची मतदार नोंदणी https:// mu. ac. in या संकेस्थळावरील ‘इलेक्शन २०२२’ किंवा https:// mu. eduapp. co. in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर याच संकेतस्थळावर शुक्रवार, १ डिसेंबर २०२३ ते रविवार २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मतदारांच्या अर्जाची छाननी, आक्षेप व मतदारयादी (तात्पुरती मतदार यादी, सुधारित मतदार यादी आणि आक्षेप) प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर संकेतस्थळावरून २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.