शेजारी राहणाऱ्याने केलेल्या या कृत्याने शेजारधर्म ही संकल्पनाच डळमळीत झाली. कोणावरही अतिविश्वास टाकणे अयोग्य. परंतु लहान मुलांना एकटे घरी ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५ डिसेंबरचा दिवस. नागपाडय़ातील शरबतवाला इमारतीत राहणाऱ्या खान कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यांची साडेतीन वर्षे वयाची झुनेरा अचानक गायब झाली होती. इमारतीच्या बाहेर तिला कुठेही खेळायलाही पाठविले जात नसे. कोण ना कोण सतत तिच्या मागावर असे. परंतु त्यादिवशी तिला काही काळ घरी एकटे ठेवण्यावाचून खान कुटुंबीयांना पर्याय नव्हता. नेमकी तेव्हाच ती बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोधाशोध करूनही आपली चिमुरडी न सापडल्याने खान कुटुंबीयांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तीन वर्षे वयाची बालिका गायब झाल्याने पोलिसांनीही गांभीर्याने तिचा शोध सुरू केला. तिची छायाचित्रे असलेली पोस्टर्स सर्वत्र लावण्यात आली. सर्व पोलीस ठाण्यांना माहिती पाठविण्यात आली. ती कशी गायब झाली असावी, याची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशात पाळतही ठेवली. सहआयुक्त देवेन भारती, उपायुक्त मनोज शर्मा जातीने तिचा शोध लागावा यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु, दोन आठवडे उलटूनही झुनेराचा काहीच शोध लागत नव्हता. अशातच भंगार व्यावसायिक असलेले झुनेराचे वडील, मुमताझ खान यांच्या मोबाइलवर १९ डिसेंबर रोजी अज्ञात इसमाचा फोन आला. ‘झुनेरा हवी असेल तर एक कोटीची खंडणी द्या’ असा निरोप त्याने दिला. मुमताझ खान पुरते हादरले. परंतु, पोलिसांनी त्यांना धीर दिला. लगेचच मोबाइल क्रमांकाची माहिती काढण्यास सुरुवात झाली. खंडणीसाठी सतत फोन येत होते. तब्बल १० ते १२ वेळा संदेश आला. परंतु एक कोटी रुपये आपल्याला शक्य नाही. २८ लाखांपर्यंत व्यवस्था होऊ शकते, असे हतबल झालेल्या खान यांनी अपहरणकर्त्यांला सांगितले. तोही तयार झाला. कळवा येथे खंडणीची रक्कम घेऊन येण्यास सांगण्यात आले. पोलिसांचे पथकही सज्ज झाले होते. २८ लाखांची खंडणी घेऊन खान रेल्वेने निघाले. वाटेत त्यांच्या मोबाइलवर पुन्हा फोन आला. त्यांना टिटवाळ्यापर्यंत जाण्यास सांगण्यात आले. पुन्हा कळव्याला बोलाविण्यात आले. कळवा येथे असलेल्या बोगद्याजवळ खंडणीची रक्कम असलेली बॅग ठेवण्यास अपहरणकर्त्यांनी सांगितले. खंडणी देऊ. परंतु आपल्याला एकदा तरी मुलीचा आवाज ऐकायचा आहे, असे खान यांनी अपहरणकर्त्यांला सांगितले. परंतु त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. पोलीस पथक तोपर्यंत कळव्याला पोहोचले होते. संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या दोघांचा पोलिसांनी पाठलागही केला. परंतु तोपर्यंत गल्लीबोळात ते पसार झाले.

मोबाइल ठावठिकाण्याचा अहवाल तोपर्यंत पोलिसांपर्यंत पोहोचला होता. शरबतवाला इमारतीशेजारी असलेल्या हाजी कासम इमारतीभोवती मोबाइलचा ठावठिकाणा आढळून येत होता. बनावट कागदपत्रे सादर करून मोबाइल क्रमांक घेण्यात आला होता, हेही चौकशीत स्पष्ट झाले. परंतु पोलिसांनी सखोल चौकशी करून हा मोबाइल क्रमांक ज्याने घेतला होता त्या सर्फराझ (नाव बदलले आहे) या १७ वर्षे वयाच्या युवकाला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच काही मिनिटातच त्याने झुनेराच्या हत्येची कबुली दिली. झुनेराच्या शेजारी राहणाऱ्या आमीर (नाव बदलले आहे) या १६ वर्षे वयाच्या मित्राचे नावही पोलिसांना सांगितले. त्यालाही ताब्यात घेतल्यानंतर दोघांनी खुनाची कबुली दिली. हाजी कासम इमारतीच्या गच्चीवर लपविण्यात आलेला झुनेराचा मृतदेहही पोलिसांना दाखविला. सडलेल्या स्थितीतील मृतदेहाची दरुगधी पसरू नये यासाठी एअर फ्रेशनरचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला होता.

जुन्या इमारतींचे भंगार विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा खान यांचा व्यवसाय होता. त्यांच्याकडे आलिशान गाडय़ांतून नातेवाईक तसेच अन्य व्यक्ती येत असत. त्यामुळेच खान यांच्याकडे भरपूर माया असावी, असा समज त्याच मजल्यावर राहणाऱ्या आमीरचा झाला होता. त्यातूनच त्याने झुनेराचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा कट शेजारील इमारतीत राहत असलेल्या सर्फराझ या आपल्या मित्राला सांगितला. दोघेही फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयात अनुक्रमे अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेत शिकत होते. झुनेरा आमीरला ‘भय्या’ म्हणून हाक मारायची. तब्बल वर्षभरापासून हा कट त्यांच्या डोक्यात होता. परंतु झुनेरा एकटी सापडत नव्हती. ५ डिसेंबरला नेमकी ती एकटी सापडली आणि आमीरने तिला चॉकलेटच्या बहाण्याने आपल्याकडे बोलाविले. नंतर शेजारील इमारतीत राहणाऱ्या मित्राकडे तिला घेऊन गेला. मित्राच्या घरी त्यावेळी कुणीही नव्हते. ही संधी साधून त्यांनी अगोदरच आणलेला क्लोरोफॉर्म वापरून झुनेराला बेशुद्ध केले. परंतु काही वेळाने तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तेव्हा मात्र ते घाबरले. काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. मोबाइल फोनच्या चार्जरच्या वायरीचा वापर करून त्यांनी गळा आवळून झुनेराला ठार केले. त्यानंतर तिचा मृतदेह त्याच इमारतीच्या गच्चीवर एका कोपऱ्यात ठेवला. मृतदेह असल्याचे कुणाच्याही लक्षात येऊ नये, यासाठी मृतदेहावर प्लास्टिक टाकले. तोपर्यंत झुनेराचा शोध सुरू झाला होता. जसे काही घडलेच नाही, अशा आविर्भावात आमीर वावरू लागला.

पोलिसांकडे खबऱ्यांकडून आलेल्या माहितीमध्ये आमीरवर संशयाची सुई वळत होती. परंतु, ठोस पुरावा हाती लागत नव्हता. मात्र, खंडणीसाठी आलेल्या दूरध्वनीच्या ठिकाणावरून पोलिसांना या प्रकरणाचा तपास करता आला. दोघेही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे तूर्तास तरी त्यांची रवानगी डोंगरी येथील रिमांड होममध्ये करण्यात आली आहे. त्यापैकी एक १७ वर्षे वयाचा असल्यामुळे अल्पवयीन मुलांच्या गुन्ह्य़ातील सहभागाबाबत दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर जारी करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची चाचपणी पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर, उपनिरीक्षक विराज भालेराव, दीपक पाटील यांच्यासह तब्बल २० अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा उलगडा केला. परंतु, झुनेराचे प्राण वाचवू न शकल्याचे शल्य त्यांना आहे.

निशांत सरवणकर @ndsarwankar

nishant.sarvankar@expressindia.com