आत्महत्येच्या पद्धतीबाबत गूगलवर माहिती शोधल्याने कृती उघडकीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : जोगेश्वरीत राहाणाऱ्या एका २५ वर्षीय माहिती तंत्रज्ञान अभियंत्याने आत्महत्या करण्याची सोपी पद्धत कोणती याबाबत इंटरनेटवर शोधाशोध सुरू केली. ‘संवेदनशील’, ‘भयावह’ अशा प्रकारचे शब्दही गुगूलवर शोधल्याने थेट अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली. या सुरक्षा यंत्रणेने प्रसंगावधान दाखवत याबाबतची माहिती नवी दिल्लीतील इंटरपोलला दिली. त्यानंतर येथून मुंबई पोलिसांना संपूर्ण माहिती देऊन या अभियंत्याला आत्महत्या करण्यापासून वाचवले. या तरूणाने याआधीही आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. 

मुंबईतील एक व्यक्ती मंगळवारी आत्महत्या करण्याच्या सोप्या पद्धतींचा गुगलवर शोध घेत असल्याची अधिसूचना ‘युनायटेड स्टेट्स नॅशनल सेंट्रल ब्यूरो (यूएसएनसीबी) इंटरपोल वॉशिंग्टन’ या अमेरिकन सुरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने यासंदर्भातील माहिती इंटरपोल नवी दिल्ली यांना दिली. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी हे प्रकरण मुंबई पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या इंटरपोल कक्षास पाठवण्यात आले. त्यानंतर ही माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ला देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ वरिष्ठांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी व पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आणि इतर माहितीच्या आधारे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जोगेश्वरी येथील २५ वर्षीय व्यक्तीला कुर्ला येथून ताब्यात घेतले. कुर्ला पश्चिमेकडील लाल बहादुर शास्त्री मार्ग येथे हा तरुण इंटरनेटवर आत्महत्या करण्याच्या सोप्या पद्धती याविषयी शोध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले.

तरुणाचे समुपदेशन

हा तरुण एका खासगी कंपनीत काम करीत आहे. त्याने त्याच्या शिक्षणाकरिता आणि दैनंदिन गरजांकरिता विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. कमी वेतनात कर्जाचे हफ्ते व घरखर्च भागवू शकत नसल्याने नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्या करण्याचा विचार करीत होता. तसेच त्याने यापूर्वी ३ ते ४ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. त्यानंतर आत्महत्या करण्याकरिता सोप्या पद्धती इंटरनेटवर शोधून आत्महत्या करण्याचे प्रयत्नात असल्याचे सांगितले. या तरुणाला ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन करून त्यास आत्महत्येपासून परावृत्त केले असून त्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The us security forces prevented a young man from committing suicide in mumbai ysh
Show comments