मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी ‘वंदे भारत साधारण एक्स्प्रेस’ सुरू होणार आहे. काही प्रमाणात वंदे भारतसारखेच वैशिष्टय़े असलेली विनावातानुकूलित ‘वंदे भारत साधारण एक्स्प्रेस’ लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. मध्य रेल्वेच्या वाडी बंदर यार्डमध्ये ही रेल्वेगाडी उभी असून कसारा घाटात येथे चाचणी केली जाणार आहे.
सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस फेब्रुवारी २०१९ पासून भारतीय प्रवाशांच्या सेवेत आली. या रेल्वेगाडीची रंगसंगती, आकार, वेग यामुळे काही कालावधीतच प्रवाशांच्या पसंतीस पडली. मात्र त्या गाडीचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी त्याच दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह कमी किमतीत प्रवास करण्यासाठी ‘वंदे भारत साधारण एक्स्प्रेस’ तयार करण्यात आली आहे. या गाडीची बांधणी चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ)मध्ये करण्यात आली असून या गाडीत पुश-पुल यंत्रणा असलेली दोन इंजिन पुढे आणि मागे लावण्यात आली आहेत. एक्स्प्रेसमध्ये १२ विनावातानुकूलित शयनयान डबे, आठ सामान्य डबे आहेत. केशरी-करडा-पांढरा रंगाची रंगसंगती या रेल्वेगाडीची आहे.