मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाऊंडेशनने नऊ रंगात खड्डे रंगवले आहेत.वॉचडॉग फाऊंडेशनने हे अनोखे आंदोलन सोमवारपासून सुरू केले असून पहिल्याच दिवशी अंधेरी पूर्वेकडील विविध रस्त्यांवरील खड्डे रंगवण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे उठून दिसत होते. अंधेरी परिसरात विमानतळाकडे जाणारा रस्ता, मेट्रो स्थानक परिसर, मरोळ चर्च रोड येथील खड्डे नऊ रंगात रंगवण्यात आले होते.खड्ड्यावरून पालिकेवर व अन्य प्राधिकरणांवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. न्यायालयानेही पालिकेला फटकारले आहे.
हेही वाचा >>> पत्रा चाळ प्रकरणी सत्ताबदलानंतर म्हाडाकडून वादग्रस्त तपशील सादर
मुंबईतील मुख्य रस्ते वगळता आतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेने नवरात्रीमध्ये खड्डे नऊ रंगात रंगवण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. वाचडॉग फाउंडेशनचे कार्यकर्ते पिमेंटा गोडफ्रे, निकोलस अल्मेडा, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अन्सारी हे या आंदोलनात सहभागी झाले होते. रंगीबेरंगी खड्ड्यांच्या या आंदोलनाची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.