मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी एक तानसा धरण बुधवारी दुपारी ४.१६ च्या सुमारास ओसंडून वाहू लागले. तसेच, २० जुलै रोजी नुकतेच तुळशी धरणही पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. मागील काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली आहे.
यंदा जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने, तसेच धरणांनी तळ गाठल्यामुळे उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरावा, यासाठी महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, आता तुळशी पाठोपाठ तानसा धरणही ओसंडून वाहू लागल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सातही धरणांमध्ये ५८.५८ टक्के इतका जलसाठा आहे.
हेही वाचा >>>आरोग्यावर अडीच टक्के तरतुदीची पंतप्रधान मोदींची २०१७ ची घोषणा हवेतच! आरोग्यावरील तरतूद निराशाजनक…
तानसा धरणाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. गेल्या वर्षी धरण २६ जुलै रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि २०२१ मध्ये २२ जुलै रोजी पहाटे ५.४८ वाजता ओसंडून वाहू लागले होते. त्यापूर्वी, २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता हे धरण पूर्ण भरुन वाहू लागले होते, अशी माहिती महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली.