गेल्या काही दिवसात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली असून सातही तलावांमधील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणी तुटवड्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही तलावांमधील वापरायोग्य पाण्याचा साठा सध्या ५०.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे जलसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार हजेरी लावलेल्या पावसाचा तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मुक्काम कायम आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्येच तलावांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. तलावांतील जलसाठा खालावल्यामुळे प्रशासनाने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र ७ जुलै रोजी जलसाठा २५ टक्क्यांवर पोहोचताच प्रशासनाने १० टक्के पाणी कपात रद्द केली. आता अवघ्या पाच दिवसांत तलावांतील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा तब्बल दुप्पट झाला आहे.
मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपताच १ ऑक्टोबर रोजी तलावांतील जलसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. या वेळी सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरली असतील तर वर्षभर मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करता येतो. अन्यथा पाणी कपातीचे नियोजन करावे लागते. सध्या सातही तलावांमध्ये सात लाख २८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. येत्या काळात तलाव काठोकाठ भरतील अशी अपेक्षा जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
तीन वर्षांचा १२ जुलैपर्यंतचा जलसाठा ( दशलक्ष लिटरमध्ये)
वर्ष एकूण साठा टक्के
२०२२ – ७,२८,२८६ – ५०.३२ टक्के
२०२१ – २,५२,३२३ – १७.४३ टक्के
२०२० – ३,२५,११० – २२.४६ टक्के