मुंबई : मुंबईत ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने ओढ दिली असली तरी गेल्या आठवड्यात पडलेल्या तुरळक पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा थोडा वाढला आहे. सातही धरणांत मिळून ८६ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. तर भातसा या सर्वात मोठ्या धरणातही ८२ टक्के पाणीसाठा आहे.
यंदा पावसाळ्यामध्ये प्रारंभी मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक १ जुलैपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. मात्र तरीही धरणातील पाणीसाठा वाढतो का याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे. पावसाने ओढ दिलेली असली तरी सातही धरणांत थोडाथोडा पाणीसाठा वाढतो आहे. ८३ टक्क्यांवर स्थिरावलेला पाणीसाठा आता ८६.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
हेही वाचा – किनारामार्ग मोकळा!; कोकणाच्या सागरी क्षेत्र आराखडय़ास केंद्राची मंजुरी
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. तरच वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करता येतो. सातही धरणांत मिळून सध्या १२ लाख ५१ हजार ७२० दशलक्षलीटर म्हणजेच एकूण साठवण क्षमतेच्या ८६.४८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीसाठ्यात अद्याप १५ टक्के तूट आहे. पावसाचा अजून एक महिना शिल्लक असून पाणीसाठ्यात तूट राहू नये याकरीता जलअभियंता विभागही धरणातील पाणी पातळीवर नजर ठेवून आहे. शहराला दररोज सर्वाधिक म्हणजे १,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा भातसा तलावही हळूहळू भरत असून या तलावातील पाणीसाठा ८२.८२ टक्के इतका आहे. या तलावात ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा या आणखी एका मोठ्या धरणातील पाणीसाठा ७४ टक्के आहे.
हेही वाचा – अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची सुटका, ४८ तासांत आरोपीला पकडण्यात जुहू पोलिसांना यश
पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
२६ ऑगस्ट २०२३ … १२,५१,७२० दशलक्षलीटर …. ८३.४८ टक्के
२६ ऑगस्ट २०२३ … १४,०६,८०२ दशलक्षलीटर …. ९७.२० टक्के
२६ ऑगस्ट २०२३ … १२,७६,२८६ दशलक्षलीटर …. ८८.१८ टक्के