मुंबई : मुंबई ते नागपूरदरम्यानचा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये पार व्हावा तसेच उत्कृष्ट वाहतूक सेवेमुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. नुकतेच समृद्धी महामार्गाच्या पिंपरी सदरोद्दिन ते वशाळा बुद्रुक या १३.१ किमी लांब, ९.१२ मीटर उंच, तर १७.६ मीटर रुंद अशा १४ व्या पॅकेजचे बांधकाम पूर्ण झाले. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची संकल्पना आखली. त्यानुसार आतापर्यंत महामार्गाचे १३ पॅकेजचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पॅकेज लवकरच पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी असा एकूण ५२० किमीचा पॅकेज मे २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर शिर्डी ते भारवीर हा टप्पादेखील सुरू झाला.
हेही वाचा >>> मोठी बातमी! रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला उच्च न्यायालयात दिलासा
अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीवर मात करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नाशिकमधील पिंपरी सदरोद्दिन ते नाशिकमधील वशाळा बुद्रुक हा एकूण १३.१ किलोमीटरचा अत्यंत अवघड टप्पा अखेर यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. यात ८ किमीचा बोगदा, २ किमीचा पुल आणि ३ किमीच्या रस्त्याचा समावेश आहे. या मार्गादरम्यान दोन पुल बांधण्यात आले असून एकाची लांबी ९१० मीटर, तर दुसऱ्याची लांबी १२९५ मीटर एवढी आहे. १२९५ मीटर लांबी असलेल्या पुलाची उंची ६० मीटर इतकी असून समृद्धी महामार्ग प्रकल्पातील सर्वाधिक उंच पुल म्हणून याला ओळखले जात आहे. पावसाचे पाणी बोगद्यात शिरू नये यासाठी २०० मीटरपर्यंत शेड टनेल बनविण्यात आले आहे.
हेही वाचा >>> “…म्हणुन मुंबईतून हातगाड्या हद्दपार होणार”, पालकमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा
विहित मुदतीपेक्षा ३ महिने अगोदर या पॅकेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. कमी कालावधीत दर्जेदार कामाचा उत्तम नमुना या पॅकेजच्या माध्यमातून दिसून आला आहे. जोरदार पाऊस, दाटीवाटीचे जंगल आणि खडकाळ डोंगरातून एनएटीएम प्रणालीचा वापर करत ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक शेखरदास यांच्या नेतृत्वात केवळ दोन वर्षाच्या कालावधीत हे पॅकेज पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात आला आहे, असे शेखरदास यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> जुन्या ५७ रेल्वे डब्यांचे अद्ययावत मालगाडीत रूपांतर
बोगद्यामध्ये दूरध्वनी, इंटरनेटची सुविधा
या पॅकेजदरम्यान ७.७८ किमी लांबीच्या तीन पदरी दोन बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्यात दर १५० मीटरच्या अंतरावर दूरध्वनी, ३० मीटर अंतरावर स्पीकर, इंटरनेट, सीसी टीव्ही यंत्रणा, वाहतूक नियंत्रण प्रणाली, रेडिओ कम्युनिकेशन, हाय प्रेशर वॉटर मिस्ट, आग प्रतिबंधक यंत्रणा, पाण्याचा निचरा होण्यासाठी जलनिस्सारण वाहिनी आदी सुविधा उपलब्ध आहेत. बोगद्यादरम्यान मुंबई – नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या ५०४ मीटर लांबीच्या आपत्कालीन मार्गाचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. हा देशातील सर्वाधिक रुंद आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे.
आव्हानात्मक परिस्थितीत पॅकेजची बांधणी
इगतपुरी या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तसेच हा भाग उंच असल्यामुळे वाऱ्याचा वेगदेखील प्रचंड असतो. समृद्धीच्या १६ व्या पॅकेजच्या बांधकामादरम्यान नजीकची दारणा नदी दुथडी भरुन वाहत होती. नदीचे पाणी बांधकाम क्षेत्रात पसरले होते. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना कामगार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्याठिकाणी असलेला पुल धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्यावरून माल वाहतूक करण्यासाठी कामगारांना मनाई करण्यात आली होती. त्यावेळी माल वाहतुकीसाठी संबंधित ठिकाणी तात्पुरता पुल बांधण्यात आला. तसेच नदीचे पाणी अडविण्यासाठी बांधदेखील तयार केला. या परिस्थितीत जवळपास ३ हजार कामगारांनी सातत्याने काम करत पॅकजचे बांधकाम पूर्ण केले.