मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेवरील कशेळी कारशेडच्या बांधकामासाठी मागितलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आर्थिक निविदेस तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, हैदराबादमधील कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे. त्यामुळे या कंपनीला कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. निविदा अंतिम करून लवकरच कामास सुरुवात करण्यात येण्याची शक्यता आहे.
‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’च्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून येत्या काही महिन्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो प्रकल्पातील म्हात्त्वाच्या कारशेडच्या कामालाही सुरुवात होणार आहे. कारशेडच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. कशेळी कारशेडच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या आर्थिक निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या असून तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हैदराबादमधील ऋत्विक प्रोजेक्ट प्रा.लि., एनसीसी लिमिटेड आणि विश्व समुद्र इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. यापैकी ऋत्विक प्रोजेक्ट प्रा.लिमिटेडने सर्वात कमी बोली लावली आहे. त्यामुळे ही निविदा या कंपनीला मिळण्याची शक्यता आहे. लवकरच ही निविदा अंतिम करण्यात येणार आहे. दरम्यान, २७.१३ हेक्टर जागेत कारशेड बांधण्यात येणार असून, तीन वर्षांत कारशेडचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.