मुंबई: ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. कामातील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पातील पहिला टप्प्याचे काम एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होईल असा दावा म्हाडाच्या मुंबई मंडळाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीचे पुनर्विकासाचे काम संथगतीने सुरु असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला होता. या पार्श्वभूमीवर म्हाडा अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी आणि रहिवाशी यांच्यात शुक्रवारी प्रकल्पस्थळी एक बैठक झाली. या बैठकीत मुंबई मंडळाच्या अधिकारी आणि कंत्राटदराने वरील दावा केला.

मुंबई मंडळाने वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव या तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास हाती घेतला आहे. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सर्वात आधी ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्विकासास सुरुवात करण्यात आली. असे असताना या चाळीचे काम संथगतीने सुरु आहे अशी तक्रार येथील रहिवाशांकडून करण्यात येत होती. यासंबंधी रहिवाशांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडेही तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रकल्प स्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी कंत्राटदार कंपनीचे अधिकारी आणि रहिवाशी यांच्या सोबत एक बैठकही घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी रहिवाशांनी कामाच्या संथगती बदल उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन केले. काम कशाप्रकारे होत आहे याची सविस्तर माहिती दिली. तर आता कामात कोणताही अडथळा नसुन प्रकल्पाचा पहिला टप्पा हा एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करून रहिवाशांना घरांचा ताबा देणार असल्याचा दावा मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती ना.म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीने दिली.

हेही वाचा… कोरेगाव-भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

दुसऱ्या टप्प्यातील १६ ते ३२ या चाळीतील रहिवाशांची पात्रता निश्चित करण्यासाठी मुंबई मंडळाकडून बीडीडी संचालकांना पत्र दिले असून लवकरच त्यांची पात्रता निश्चित होईल. तसेच पोलिसांच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीमधील पात्र रहिवाशांचे कायमस्वरूपी करारनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांना हे करारनामे दिली जातील असेही यावेळी मुंबई मंडळाकडून सांगण्यात आल्याचीही माहिती समितीकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The work of n mjoshi marg bdd chawl redevelopment project has been speeded up mumbai print news dvr