मुंबई : ऐतिहासिक मुरुड-जंजिरा किल्ल्यावर पोहोचणे पर्यटकांना सोपे व्हावे यासाठी किल्ल्याला जोडणाऱ्या जंजिरा जेट्टीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून १११ कोटी रुपये खर्चाचे काम जून २०२४ मध्ये पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे जून २०२४ पासून जंजिरा किल्ल्याची वाट सुकर होणार आहे.
समुद्रात असलेला जंजिरा किल्ला पर्यटकांचे आणि शिवप्रेमींचे आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्याला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र यावेळी अनेकांना किल्ल्यावर पोहोचणे अवघड बनते. मुळात किल्ल्यावर शिडाच्या बोटीने पोहोचावे लागते आणि त्यात किल्ल्यावर जाण्यासाठी जेट्टी नसल्याने बोटीतून किल्ल्याच्या पायऱ्यांवर उतरणे अनेकांना अशक्य होते. लाटा आणि वारा यामुळे बोट हेलकावे खात असते. अशावेळी लहान मुले, वृद्ध यांना बोटीतून उतरताना कसरत करावी लागते. यावेळी अपघातही होतात. या पार्श्वभूमीवर किल्ल्याजवळ जेट्टी बांधावी अशी मागणी कित्येक वर्षांपासून केली जात होती. अखेर ही मागणी मान्य करत सागरी मंडळाने किल्ल्याजवळ जेट्टी बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सागरमाला योजनेअंतर्गत ही जेट्टी उभारण्याचे निश्चित करून यासाठी पुरातत्व विभागाची मंजुरी सागरी मंडळाने घेतली. तर वर्षभरापूर्वी १११ कोटींच्या या कामासाठी निविदा जारी केली. तर आता निविदा अंतिम करत फोर्कन इन्फ्रा या कंपनीला कंत्राट देण्यात आले असून कंपनीकडून कामास सुरुवात करण्यात आल्याची माहिती सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा – विश्लेषण : मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमधून खरेच सूट मिळणार का?
जंजिरा जेट्टीच्या कामाअंतर्गत मांडवा जेट्टीच्या धर्तीवर जंजिरा किल्ल्यालगत २५० मीटर लांब लाटरोधक भिंत (ब्रेकवॉटर) बांधण्यात येणार आहे. या भिंतीला लागून जेट्टी असणार आहे. ही जेट्टी समुद्राच्या दिशेने असलेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराजवळ २०० ते २५० प्रवाशी एकावेळेस उभे राहू शकतात. त्यामुळे सागरी मंडळाकडून समुद्राच्या दिशेने असलेल्या प्रवेशद्वाराची निवड करण्यात आली आहे. या जेट्टीच्या कामाला सुरुवात झाली असून जून २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे सागरी मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील वर्षी जंजिरा किल्ल्याला जाणे अंत्यत सोपे होणार आहे.