मुंबई: मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भांडूप पश्चिमेकडे असलेल्या पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात नवीन शुद्धीकरण प्रकल्प निर्माण करण्यात येणार असून त्याचे काम नवीन वर्षात सुरू होणार आहे. जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपत आल्यामुळे पालिकेने हा साडे तीन हजार कोटींचा प्रकल्प हाती घेतला असून त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराबाहेर कित्येक किमी अंतरावर असलेल्या धरणांतील पाणी मुंबईकरांच्या घराघरात पोहोचण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची अशी त्रिस्तरीय यंत्रणा आहे. धरणातील पाणी २४०० मि.मी. ते ३००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे व ५५०० मि.मी. व्यासाच्या कॉंक्रिटच्या भूमीगत जलबोगद्याच्या सहाय्याने गुरुत्वाकर्षद्वारे पांजरापुर व भांडुप संकुल येथे आणले जाते. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात निर्जंतुक केले जाते व तेथून एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी मुंबई शहरात ठिकठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयापर्यंत पोहोचवले जाते. मात्र जलशुद्धीकरण करणारा हा प्रकल्प पालिकेने ४४ वर्षांपूर्वी बांधला असून त्याचे आयुर्मान आता संपत चालले आहे. हा प्रकल्प संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाला असून त्याचे वापरण्यायोग्य आयुर्मानही संपत चालले आहे. त्यामुळे पालिकेने भांडूप संकुल परिसरात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा… मुंबई : घाटकोपर येथील चाळीस वर्षे जुन्या शाळेची पुनर्बांधणी

अर्थसंकल्पात तशी घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी चालू अर्थसंकल्पात ३५० कोटींची तरतूदही करण्यात आली होती. जानेवारी महिन्याच्या अखेरपासून या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बांधून पूर्ण होईपर्यंत जुना प्रकल्प सुरू ठेवण्यात येणार आहे. नवीन प्रकल्प बांधून झाल्यानंतर त्याला सर्व यंत्रणा जोडण्यात येणार आहेत. या संकुलात ९०० दशलक्षलीटर क्षमतेचा आणखी एक जलशुद्धीकरण प्रकल्प असून या संकुलाची एकूण जलशुद्धीकरणाची क्षमता २८१० दशलक्षलीटर इतकी आहे.

क्षमता वाढणार

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणी पुरवठा हा भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. सध्या या ठिकाणी १९१० दशलक्षलीटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प असून नवीन प्रकल्पात याची क्षमता २००० दशलक्षलीटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The work of the new water treatment plant in the bhandup complex will begin at the end of january mumbai print news dvr
Show comments