मुंबई : हार्बर मार्गावरील रे रोड येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नवा उड्डाणपूल आकार घेत असून सप्टेंबर २०२४ पर्यंत या पुलाची सर्व कामे पूर्ण होऊन तो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील रस्ते वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्याची शक्यता आहे. तसेच या पुलावर पदपथही बांधण्यात आल्याने बॅरिस्टर नाथ पै रोड, माहुल आणि रे रोड स्थानकातील प्रवाशांना याचा फायदा होईल.

अंधेरी स्थानकाजवळील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सर्व पुलांची आयआयटीमार्फत संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर धोकादायक पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रे रोड येथील ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवा प्रशस्त पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फेब्रुवारी २०२२ पासून महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल-एआरआयडीसी) रे रोड सागरी सेतूप्रमाणे केबल स्टेड पूल बांधण्याचे काम हाती घेतले. सध्या या पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य महारेलने ठेवले आहे. दरम्यान, या पुलाचे बांधकाम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. त्यासाठी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेऊन पुलाच्या तुळया उभारण्याचे काम करण्यात आले. ब्लाॅक मिळताच कामे पूर्ण करण्यात आली. रेल्वेलाही प्रत्येक वेळी ब्लाॅक देणे शक्य होत नाही, असे महारेलकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>झोपु घरांचे स्थलांतर आता सोपे! ॲानलाईन सुविधा उपलब्ध

हार्बर मार्गावरील काॅटन ग्रीन आणि डाॅकयार्ड रोड दरम्यान रे रोड स्थानक आहे. या स्थानकामुळे भायखळा आणि माझगाव परिसर जोडला जातो. ब्रिटिश राजवटीत मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या नावाने या स्थानकाला आणि उड्डाणपुलाला नाव देण्यात आले होते. १९१० मध्ये बांधलेल्या जुन्या पुलावर केवळ दोन वाहतूक मार्गिका होत्या. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. त्यात रे रोड स्थानकाला घोडपदेव असे नाव देण्याचे विचाराधीन आहे.

– रे रोड उड्डाणपुलावर आधी वाहनांसाठी दोन मार्गिका होत्या.

– नवीन पुलावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका अशा एकूण सहा मार्गिका आहेत.

– रे रोड पुलाची लांबी ३८५ मीटर आणि रुंदी २५.५ मीटर आहे.

– पुलाच्या खांबाची संख्या कमी करण्यासाठी केबल स्टेड पुलाचा वापर केला आहे.

– नवीन पूल उभारणीसाठी १७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

– एलईडी विद्युत रोषणाई असलेल्या या नवीन पुलामुळे ऐतिहासिक वास्तुच्या सौंदर्यात भर पडेल.

– नागरिकांना आकर्षित करण्यासाठी नवीन पुलावर सेल्फी पॉइंट असेल.

हेही वाचा >>>पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासाक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर,पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार १ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा

मुंबईतील ब्रिटिशकालीन जीर्ण झालेल्या पुलाचे तोडकाम सुरू आहे. नुकताच मध्य रेल्वेच्या शीव स्थानकाजवळील शीव उड्डाणपूल सर्व वाहतुकीसाठी बंद केला आहे. या पुलाचे पाडकाम लवकरच सुरू होईल. या पुलाची बांधणी मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका करणार आहे. मात्र, सर्व वाहतुकीसाठी पूल बंद केल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. तर, दुसरीकडे रे रोड स्थानकालगत उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीपासून वाहनचालकांची सुटका होईल.