अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या मर्सिडिज गाडीतून ५१ हजार रुपये आणि लॅपटॉप चोरटय़ांनी पळविला. वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी तिने गाडी पार्क केली होती. त्यावेळी अज्ञात चोरटय़ाने गाडीतून रोख रक्कम असलेली बॅग आणि लॅपटॉप लंपास केला.
 गुरुवारी दुपारी उर्वशी ढोलकिया आपला भाऊ अनुप आणि आई कौशल ढोलकिया यांच्यासह हॉटेलात दुपारी जेवणासाठी गेली होती. त्यावेळी तिने आपली गाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. दुपारी पाऊणच्या सुमारास परत आल्यावर तिच्या गाडीतून रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरी झाल्याचे लक्षात आले. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे. पोलिसांनी हॉटेलचा सुरक्षारक्षक आणि गाडीचा वाहनचालक अन्वर शेख यांचे जबाब नोंदविले आहेत. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथूनच क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्याही गाडीची काच तोडून चोरटय़ांनी महागडी म्युझिक सिस्टीम लांबवली होती.