वांद्रे येथील ढाब्यामध्ये चिकनच्या थाळीमध्ये चक्क मृत उंदीर आढळल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी ढाब्याचा व्यवस्थापक, आचारी व चिकन पुरवठा करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी सरकारने आता पावलं उचलली असून अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून मुंबईतील हॉटेलांमध्ये तपाससत्र सुरू करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ही माहिती दिली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

“तीन चार दिवसाआधी आमच्या विभागात तक्रार आली की जेवणात उंदीर सापडला आहे. त्यादृष्टीकोनातून नमुने घेतले जात आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या क्षेत्रातील पाच रेस्टॉरंट तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवणात उंदीर सापडला आहे, त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे”, असं धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

हेही वाचा >> ढाब्यावर थाळीत मृत उंदीर; वांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

“कोणत्या हॉटेलमध्ये धाडसत्र टाकलं पाहिजे याचेही निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, त्यांच्याकडून नमुने घेण्यात आले असून लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल”, असंही धर्मराव आत्राम म्हणाले. गंभीर स्वरुपचा गुन्हा असेल तर त्यांना मकोका लावणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला. मी मंत्री झाल्यापासून जवळपास १०० कोटींचं उत्पन्न या धाडसत्रांतून मिळालं असल्याचीही माहिती त्यांनी दिली. असे प्रकार वारंवार होत राहिले तर संबंधित हॉटेल्सचा परवानाही रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

जेवत असताना तक्रारदार अनुराग सिंह (४०) चिकनच्या थाळीमध्ये मृत उंदीर असल्याचे लक्षात आले. त्यांनी ढाब्याचा व्यवस्थापक व्हिवियन अल्बर्ट शिक्केराश (४०) यांच्याकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर सिंह यांनी याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार यांना जेवणात मृत उंदीर देऊन जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ढाब्याचा व्यवस्थापक आणि स्वयंपाकीला अटक केली आहे.