* ‘भारतमाता’ला आगाऊ तिकीट विक्रीची सोयच नाही * मालक म्हणतात, ‘आगाऊ’मुळे काळा बाजार वाढेल
भारतमाता चित्रपटगृहाबाहेर सोमवारी झालेल्या खुनाच्या घटनेनंतर आता या ठिकाणी आगाऊ तिकीटविक्री असावी की नसावी यावर चर्चा झडू लागल्या आहेत. आगाऊ तिकीटविक्री नसल्याने भारतमाता चित्रपटगृहात चालू तिकीटविक्रीसाठी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे ७५० जण रांगेत उभे राहून तिकीट घेतात. अशा वेळी रांगेत घुसून ते थेट हाणामारीचे प्रकारही होतात. सोमवारचा प्रकार त्यातलाच होता. परंतु आगाऊ तिकीटविक्री केल्यास अशा घटना टाळता येतील असे चित्रपट रसिकांचे मत आहे. मात्र, चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने आगाऊ आणि चालू तिकीटविक्री यांचा सोमवारच्या घटनेशी काडीमात्र संबंध नसल्याचे सांगत आगाऊ तिकीटविक्री सुरू केल्यास तिकिटांचा काळाबाजार वाढेल अशी भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, आरोपी अशोक चव्हाण याला न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘भारतमाता’ चित्रपटगृहात आगाऊ तिकीटविक्रीची सोय नाही. त्यामुळे चित्रपटाच्या खेळाच्या आधी चालू तिकीट विक्रीसाठी चित्रपटगृहाबाहेर रांगा लागतात. या रांगेत मध्येच लोक घुसल्याने अनेकदा वादावादी झाली आहे. सोमवारी घडलेली घटना ही याच वादावादीचा परिपाक होता. अनेकदा लोक तीन वाजताच्या खेळाच्या तिकिटांसाठी रांगेत उभे राहतात. मात्र तीनच्या खेळाची तिकिटे न मिळाल्याने सहाच्या खेळासाठी रांगेतील आपली जागा कायम ठेवतात, असे ‘भारतमाता’च्या नियमित प्रेक्षकांनी सांगितले.
मात्र, हा आरोप चित्रपटगृहाचे मालक कपिल भोपटकर यांना मान्य नाही. भोपटकर यांच्या मते घडलेल्या घटनेचा संबंध हा तिकीट विक्रीशी लावता येणार नाही. केवळ चित्रपटाची तिकिटे मिळाली नाहीत, म्हणून कोणीही कोणाचा खून करणार नाही. त्या दोघांमध्येही बाचाबाची झाली व शारीरिक चकमकही उडाली होती. त्यानंतरच ती घटना घडली. यासाठी आगाऊ किंवा चालू तिकीट विक्रीच्या व्यवस्थेला जबाबदार धरता येणार नाही, असे भोपटकर यांचे म्हणणे आहे. तसेच आगाऊ तिकीटविक्री सुरू केल्या तिकिटांचा काळाबाजार वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader