महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते लपूनछपून राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक करीत आहेत. राज्यात दुष्काळाची स्थिती असल्यामुळे आम्हाला वातावण बिघडवायचे नाही. राष्ट्रवादीने कधीही कोणाबद्दल अपशब्द काढलेले नाहीत. राजकारणातील मर्यादा आम्ही पाळल्या आहेत. मात्र तरीही मनेसेने दगडफेक आणि अपशब्द काढणे थांबविले नाही तर मात्र राष्ट्रवादीही जशास तसे उत्तर देईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती दत्ताजी निकम यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी अजित पवार, मधुकर पिचड, भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी पवार यांनी हा इशारा दिला. पक्षकार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष सदैव राहील, असे सांगत त्यांनी भास्कर जाधव यांची पुन्हा एकदा पाठराखण केली.
शाही विवाहाचे समर्थन
कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी आपल्या घरच्या शाही विवाहाचे जोरदार समर्थन केले. आपण सातवेळा आमदार झालो. अनेक पदे भूषविली. मात्र घरात लग्न एकदाच केले. आमदार होण्याची अनेकदा संधी असली तरी लग्न एकदाच करता येते. अन्य लोकांच्या लग्नात जेवलो मग आपल्या घरी लग्न असेल तर लोकांना बोलवायचे नाही का, त्यांना जेवण द्यायचे नाही का? असा सवाल करीत शाही विवाह सोहळ्याचे समर्थन केले.