राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभेतून बदनामी व त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना चौकशीकरता बोलवत त्यांना तात्काळ अटकही करण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून दत्ता दळवी यांना १२ डिसेंबरपर्यंत ठाण्यातील कारागृहात ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या अटकेवर स्थगिती यावी याकरता ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली आहे. उद्यापर्यंत स्थगिती नाही मिळाली तर इशान्य मुंबईत चक्काजाम करणार असल्याचा इशाराही ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी दिला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील राऊत म्हणाले की, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सकाळी १०-१२ पोलीस मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या घरी गेले आणि एका ३०२, ३०७ (हत्येप्रकरणी लावण्यात येणारी कलमे) चा ज्याप्रमाणे कैदी असतो त्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या वकिलांनी याविरोधात लढा देऊन न्यायमूर्तींनी न्यायालयीन कोठडी दिली. साडेअकरा वाजता न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर दोन तासांत यावर स्थगिती यायला हवी होती. परंतु, स्थगिती अद्यापही आलेली नाही. स्थगिती देण्यासाठी चालढकल सुरू आहे.

हेही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील विधानाबद्दल माजी महापौरांना अटक

न्यायव्यवस्थेवर विश्वास पण सरकारवर नाही

“अटकेला स्थगिती मिळावी याकरता आम्ही डीसीपींना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली आणि आज कोणत्याही परिस्थितीत स्थगिती पाठवतो असं ते म्हणाले. परंतु, दत्ता दळवी यांची रवानगी ठाणे तुरुंगात केली आहे, जेणेकरून आज त्यांना स्टे मिळणार नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असला तरीही आमचा सरकारवर विश्वास नाही”, असंही ते म्हणाले.

माजी महापौराची चुकीच्या पद्धतीने अटक

“पोलिसांना आम्हाला मदत करायची असली तरीही त्यांच्यावर सरकारचा दबाव आहे. आज आम्हाला स्टे मिळाला नाही, याचा अर्थ त्यांच्यावर सरकारचा दबाव आहे. चुकीच्या पद्धतीने मुंबईच्या महापौर, ज्येष्ठ नागरिक, तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या माणसाला अटक केली, याचा आम्ही निषेध करतो, असं म्हणत त्यांनी संतापही व्यक्त केला.

हेही वाचा >> ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकनाथ शिंदेंवर…”

आमचं सरकार स्थापन झाल्यास…

“ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली आणलं त्या दिवसापासून आमचा लढा चालू झाला आहे. हा लढा सुरूच राहिल. एक लक्षात ठेवा, सरकार अमर नव्हे. उद्या आमचं सरकार शंभर टक्के येणार. महाराष्ट्रात सर्व्हे केला तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला आहे, त्या सगळ्यांना आम्ही तुरुंगात टाकणार. त्यांना बेल मिळणार नाही हे लक्षात ठेवा. या सरकारचा आम्ही विरोध करतोय”, असंही ते म्हणाले.

ईशान्य मुंबईत चक्काजाम करू

“उद्यापर्यंत स्टे मिळाला नाही तर ईशान्य मुंबईतील एलबीएस रोड, हायवे, सर्व पोलीस ठाणे या ठिकाणी दुपारी १२ वाजता जाम करून टाकू. दत्ता दळवी बाहेर येणार नाहीत तोवर रस्त्यावरील आंदोलन सुरू ठेवू”, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.