मुंबई: औषध विक्री दुकानांमध्ये औषध विक्रेता (फार्मासिस्ट) असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, मुंबईसह ठाण्यामध्ये जवळपास २०० हून अधिक दुकानांमध्ये औषध विक्रेतेच नसल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
डॉक्टरांनी चिठ्ठीत लिहून दिलेले औषध रुग्णाला अचूक मिळावे यासाठी औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये औषधनिर्माण-शास्त्रातील पदविका-पदवीधारक औषध विक्रेता म्हणजेच फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. दुकानात औषध विक्रेता नसेल तर त्या दुकान मालकाचा परवाना रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून होणे अपेक्षित असते. दुकान मालकाला औषध विक्रेत्यांची नोंद अन्न व औषध प्रशासनाच्या fdamfg. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर करणे बंधनकारक आहे.
हेही वाचा… मुंबई: पुनर्विवाहित मुस्लिम महिलेलाही देखभाल खर्च मागण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा
औषध दुकानांमध्ये औषध विक्रेता आहे की नाही याची तपासणी करणे अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाच्या संकेतस्थळावर औषध विक्रेता नसल्याची नोंद करण्यात आली असली तरी याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांविना रुग्णाला चुकीचे औषध दिले गेल्यास त्याची जबाबदारी कोणाची असेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार मुंबईतील ७ प्रभागांमध्ये १६५ औषध दुकानांमध्ये औषध विक्रेते नाहीत. यामध्ये पश्चिम उपनगरातील सर्वाधिक औषध विक्री दुकानांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ १ म्हणजे दिघा परिसरात १८, तर परिमंडळ २ म्हणजे मिरारोड भाईंदर परिसरात ६५ दुकानांमध्ये औषध विक्रेते नाहीत.
परिमंडळनिहाय आकडेवारी
मुंबई परिमंडळ
१ – डोंगरी १
२ – वरळी – अॅन्टॉप हिल १३
३ – चेंबूर – विद्याविहार – २७
४ – कुर्ला – मुलुंड – २९
५ – विलेपार्ले – अंधेरी – ३०
६ – जोगेश्वरी – गोरेगाव – २९
७ – कांदिवली – दहिसर – ३६
ठाणे परिमंडळ
१ – दिघा – १८
२ – भाईंदर – ६५
मुंबई आणि ठाणे परिसरातील जवळपास २०० पेक्षा अधिक औषधांच्या दुकानांमध्ये औषध विक्रेते नाहीत. ही बाब गंभीर असून, अशा दुकान मालकांची चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. – अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशन
काहीजण व्यवसाय बंद करतात, पण त्याची ऑनलाइन नोंद करत नाहीत. त्यामुळे काही दुकानांमध्ये औषध विक्रेता नसल्याचे दिसते. आमचे औषध निरीक्षक ठरावीक कालावधीने सर्व औषध दुकानांची तपासणी करीत असतात. त्यामुळे असा काही प्रकार झाल्याची शक्यता नाही. – भूषण पाटील, सहआयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन