लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: जुलैच्या सुरुवातीपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये डेंग्यू व हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर अवघ्या आठवडाभरामध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. १५ दिवसांमध्ये राज्यामध्ये हिवतापाचे ७२५ तर डेंग्यूचे ५२८ रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्येतील वाढ शहरांमध्ये अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
पावसाळ्यामध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत असते. असे असले तरी नागरिकांच्या दुर्लक्षामुळे साथीच्या आजारांमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. राज्यामध्ये ७ ते २१ जुलैदरम्यान हिवतापाचे ७२५, तर डेंग्यूचे ५२८ रुग्ण सापडले. ही वाढ ७ ते १४ जुलै या सात दिवसांच्या तुलनेत दुप्पट आहे. राज्यामध्ये ७ ते १४ जुलैदरम्यान हिवतापाचे ३०३, तर डेंग्यूचे १८९ रुग्ण सापडले. तर १५ ते २१ जुलैदरम्यान हिवतापाचे ४२२, डेंग्यूचे ३३९ रुग्ण सापडले.
हेही वाचा… मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित
हिवतापाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील काही भागात हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु १५ शहरे आणि १३ जिल्ह्यांमध्ये अद्यापपर्यंत हिवतापाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. याउलट आतापर्यंत दोन जिल्हे व दोन शहरांमध्ये डेंग्यूचा एकही रुग्ण सापडलेला नाही. ७ ते २१ जुलै या १५ दिवसांत शहरांमध्ये हिवतापाचे सर्वाधिक ३५७ रुग्ण मुंबईत, तर ग्रामीण भागामध्ये गडचिराेली जिल्ह्यामध्ये २६७ रुग्ण सापडले आहेत. तसेच डेंग्यूचे सर्वाधिक २६४ रुग्ण मुंबईत, तर ग्रामीण भागात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २९ रुग्ण सापडले आहेत.
चिकनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून हिवताप आणि डेंग्यूबरोबरच काही प्रमाणात चिकनगुन्याच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात ७ ते २१ जुलै या कालावधीत चिकनगुन्याचे २८ रुग्ण सापडले आहेत. तसेच ७ ते १४ जुलै या काळात १६, तर १५ ते २१ जुलै या कालावधीत १२ रुग्ण सापडले आहेत.