मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार राज्यात नुकतीच ‘क्षयरोग मुक्त पंचायत’ अभियानाला सुरुवात करण्यात आली. मात्र मागील काही महिन्यांपासून मुंबईमध्ये क्षयरुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना कोणतीच औषधे मिळू शकलेले नाही. खासगी दुकानांमध्येही औषधे उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची अवस्था बिकट झाली आहे. वेळेत औषधे न मिळाल्यास मुंबईसह राज्यामध्ये क्षयरोग रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय क्षयरोग मुक्त अभियानाला यश मिळत असल्यामुळे देशातील क्षयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार २०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र जून २०२३ पासून क्षयरोग आणि एमडीआर क्षयरोगावरील औषधांच्या साठ्यामध्ये सातत्याने तुटवडा निर्माण झाला आहे. क्षयरुग्णांसाठी आवश्यक असलेली मॉक्सीफ्लोकॅसिन, लिनेझोलिड, क्लोफजमाईन, पीरिडॉक्साईन, डेलामानिड, सिक्लोजरीने या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

हेही वाचा… म्हाडाच्या सोडतीत एकाच प्रवर्गात एकाच आडनावाचे अनेक विजेते; १९ विजेत्यांना खुलासा करण्याची सूचना

सरकारच्या डॉट्स केंद्रांवर, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवरही औषधे मिळत नसल्याने रुग्णांना औषधे विकत घ्यावी लागत होती. मात्र ही औषधे महागडी असून आठवड्याभरासाठी रुग्णांना साधारण २ ते ३ हजार रुपयांची औषधे लागतात. परिणमी, आर्थिक स्थिती बेताची असलेल्या रुग्णांना महागडी औषधे खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे औषधांमध्ये खंड पडून रुग्णाच्या प्रकृतीवर परिणाम होतो. औषधे उपलब्ध नसल्याने आणि विकत घेणे परवडणारे नसल्याने रुग्णांना औषधांसाठी वारंवार केंद्रांवर जावे लागत आहे. यासाठी त्यांना कामावरून सुट्टी घ्यावी लागत आहे.

हेही वाचा… VIDEO: गोष्ट मुंबईची भाग – सार्वजनिक गणेशोत्सव : गिरणगावातून उपनगरांकडे!

जगामध्ये दररोज क्षयामुळे ४५००, तर भारतामध्ये जवळपास १४०० रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून, यावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती एचआयव्ही, क्षयरोग समन्वयक आणि समाजसेवक गणेश आचार्य यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविय, सचिव सुधांश पंत आणि राष्ट्रीय क्षयरोग निमूर्लनचे डॉ. राजेंद्र जोशी यांना पत्राद्वारे केली आहे.

रुग्णाचे होणारे हाल आणि पुन्हा क्षयरोग वाढण्याची शक्यता यामुळे डॉट्स केंद्रांवर तातडीने औषधे उपलब्ध करवी. केंद्रीय आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियानाचे अधिकारी, औषध वितरक, क्षयरोग रुग्णांवर काम करणारे समाजसेवक यांची तातडीने समिती नेमावी. ही समिती औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करेल, अशी मागणीही आचार्य यांनी पत्राद्वारे केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There has been a shortage of medicines required for tuberculosis patients in mumbai due to this the number of tuberculosis patients will rise mumbai print news dvr
Show comments