मुंबई : नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी (१३ डिसेंबर) लासलगाव बाजार समितीत लाल कांदा म्हणजे खरीप हंगामात निघालेला कांदा सरासरी ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दराने विकला जात होता. सोमवारी (१६ डिसेंबर) कांद्याचे भाव १२०० ते १६०० रुपये किलो रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. कांद्याच्या दरात अचानक झालेल्या पडझडीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
राज्यात गेले महिनाभर कांद्याचे दर चढे होते. किरकोळ बाजारात ग्राहकांना शंभर रुपये किलोपर्यंत कांदा विकत घ्यावा लागत होता. आता खरीप हंगामातील लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. खरीप कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी (१३ डिसेंबर) सरासरी ३००० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला विकला जात होता. पण, लाल कांद्याची काढणी पूर्ण झाल्यामुळे आणि लाल कांद्याची बाजारातील आवक वाढल्यामुळे सोमवारी (१६ डिसेंबर) कांदा १२०० ते १६०० रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. केवळ चार दिवसांत कांद्याचा दर निम्म निम्म्यावर आला आहे. कांद्याच्या दरातील या पडझडीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
हेही वाचा…२०२५चा गणेशोत्सव ‘पीओपी’मुक्त? पर्यावरणपूरक उत्सव नियोजनासाठी पुढील आठवड्यात बैठक
े
खरीप कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा कांदा फार काळ टिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा तातडीने विकावा लागतो. जेमतेम दीड – दोन महिने हा कांदा टिकत असल्यामुळे व्यापाऱ्यांना गोदामात हा कांदा जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. शिवाय या कांद्याला निर्यातीसाठी ही फारशी मागणी नसते. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ सारख्या शेजारी देशांमध्ये काही प्रमाणात हा कांदा जातो. पण, देशातून होणाऱ्या कांदा निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क असल्यामुळे लाल कांद्याची निर्यात फारशी होत नाही. एकीकडे निर्यातीसाठी कमी मागणी असणे आणि दुसरीकडे बाजारात दर पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
दर घसरणीचा मुद्दा संसदेत
दिंडोरीचे खासदार प्रा. भास्कर भगरे यांनी शून्य प्रहरात कांदा दरात झालेल्या पडझडीचा प्रश्न संसदेत उपस्थित केला. फक्त चार दिवसांत कांदा दर निम्म्याने कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर असलेले २० टक्के शुल्क तातडीने हटवावेत आणि निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भगरे यांनी लोकसभेत केली.
नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये चार दिवसांपूर्वी साडेतीन ते चार हजार प्रती क्विंटल रुपयांवर स्थिर असलेल्या लाल कांद्याचे दर थेट निम्म्यावर आले आहेत. सटाणा, लासलगाव, चांदवड, उमराणे, देवळा येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. सरकारने तातडीने पाऊले उचलून कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करून कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.
हेही वाचा..रेल्वेतील अपंगांच्या डब्यात घुसखोरी, तीन वर्षांत ९ हजार जणांवर कारवाई
ग्राहकांना किफायतशीर दरात कांदा कधी उपलब्ध होणार ?
नाशिकमधील बाजार समितीमध्ये कांदा प्रति किलो १२ ते १६ रुपये दराने विकला जात असला तरी पुणे, मुंबईतील किरकोळ बाजारात कांदा अद्यापही ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना किफायतशीर दरात कांदा कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करत आहेत.