मुंबई : तिरुअनंतपुरम येथून मुंबईला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी शुक्रवारी प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. माहितीनंतर विमानतळ सुरक्षा व पोलिसांनी सर्वत्र तपासणी केली. पण काहीही संशयीत सापडले नाही.

विमानातील कर्मचाऱ्यांना ‘विमानात बॉम्ब’ असे नमुद केलेली चिठ्ठी सापडली होती. त्यानंतर त्यांनी नियमाप्रमाणे सर्व यंत्रणांना याबाबतची माहिती दिली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच विमान कंपनीने पोलिसांना याची माहिती दिली. प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आल्यानंतर तात्काळ सर्व वस्तू व बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही.

हेही वाचा >>>गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांचे हाल

विस्तारा विमान कंपनीच्या प्रतिनिधीनी याबाबत अधिकृत माहिती दिली. त्यात २८ जून २०२४ रोजी तिरुअनंतपुरमहून मुंबईला जाणारे विस्तारा कंपनीचे विमान यूके ५५२ मधील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. नियमानुसार, आम्ही ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले आणि विमान सुरक्षितपणे आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्रवाशांना सुरक्षित उतरवण्यात आले. त्यानंतर अनिवार्य सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सुरक्षा यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले. विस्तारा प्रवासी, कर्मचारी आणि विमान यांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो, असे विस्ताराकडून सांगण्यात आले.