पुणे, मुंबई : देशात जुलै महिन्यात सरासरीएवढा मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास ७ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी वर्तवला.‘‘यंदा देशात मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. मोसमी वाऱ्यात फारसा जोर नव्हता. पण, बिपरजॉय चक्रीवादळीमुळे मोसमी वारे वेगाने देशभरात पोहोचले. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, दक्षिण भारत, ईशान्य भारतात जूनच्या शेवटच्या आठवडय़ात चांगला पाऊस झाला आहे. तरीही किनारपट्टीवर पडलेला पाऊस जून महिन्याच्या सरासरीपेक्षा कमीच आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर दोन दिवसांत कमी होईल. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पावसाला पोषक स्थिती तयार होईल. साधारण ७ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई आणि उपनगरासह नवी मुंबई, ठाणे परिसरात शुक्रवारी जोरदार पावसाची नोंद झाली.
पाच दिवस मुसळधारांचा अंदाज
महाराष्ट्रापासून केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस कोकण आणि गोव्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडय़ात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.