मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील आरे ते बीकेसी मार्गिकेदरम्यान प्रवाशांना अखंडित मोबाईल सेवा पुरविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) एका त्रयस्थ खासगी कंपनीच्या माध्यमातून दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान केल्या जात आहेत. त्यानुसार मेट्रो ३ मार्गिकेवर एअरटेल, वोडाफोन कंपनीची नेटवर्क सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, आरे ते बीकेसी मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होऊन सहा महिने झाले, तरी अद्याप या मार्गिकेवर जिओचे नेटवर्क नाही.

त्यामुळे जिओ कार्डधारकांना मेट्रो ३ मार्गिकेवर प्रवसा करताना ई-तिकीट काढणे अशक्य होत आहे. तर प्रवासादरम्यान मोबाईलवरून कोणाशीही संपर्क साधता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिओ कार्डधारक प्रवाशांची मेट्रो ३ प्रवासादरम्यान गैरसोय होत असून अनेक तक्रारी एमएमआरसीकडे येत आहेत. यासाठी एमएमआरसीकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे.

भुयारी मेट्रो स्थानकावर गेल्यास जिओचे नेटवर्क नसल्याने ई-तिकिटऐवजी कागदी तिकीट प्रवाशांना खरेदी करावे लागते. महत्त्वाचे म्हणजे प्रवासादरम्यान मोबाईल वापरता येत नसल्याने मेट्रो ३ कडे आयटीसह इतर क्षेत्रातील नोकरदार वर्ग वळत नसल्याचीही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.