पश्चिम रेल्वेवर अंधेरी-विलेपार्ले या स्थानकांदरम्यान लोकल गाडी रुळावरून घसरून झालेल्या अपघाताचा प्राथमिक अहवाल तयारच झाला नसल्याची बाब समोर आली आहे. हा अहवाल तयार करणारे वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी प्रकृतीच्या तक्रारीने रुग्णालयात दाखल झाल्याने हा अहवाल पूर्ण झाला नाही. परिणामी अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी पाहणी करायला गेलेल्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी या अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत सुरू झाली असून पहिल्याच दिवशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पश्चिम रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले.
रेल्वेचा कोणताही अपघात झाल्यानंतर वाहतूक, रेल्वे डबे, अभियांत्रिकी, ओव्हरहेड वायर, विद्युत आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची एक समिती त्याच दिवशी घटनास्थळी जाऊन पाहणी करते. या समितीचा अहवाल वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नजरेखाली तयार होतो. या अहवालात अपघातस्थळी आढळलेल्या सर्व गोष्टींचा तपशील नमूद केलेला असतो. मंगळवारी पश्चिम रेल्वेवर हा अपघात झाल्यावर घटनास्थळी या विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी पाहणी सुरू केली. मात्र, या पाहणीचा अहवाल सादरच झाला नाही. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी तिवारी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि हा अहवाल तयारच झाला नाही, असे एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांना हा अहवाल तातडीने तयार करून सादर करण्याचे आदेशही दिले होते. शुक्रवारी या अपघाताची चौकशी चालू झाली असून पहिल्याच दिवशी सर्व रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्यात आली. यात विभागीय रेल्वे व्यवस्थापक अभियांत्रिकी अधिकारी, रेल्वे कर्मचारी, ओव्हरहेड वायरसंबंधीचे कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा