मुंबई, ठाण्यासारख्या शहरात जागेला मोठी किंमत असल्यामुळे इंच इंच वाचविणाऱ्या विकासकांकडून मनोरंजन मैदान अनेकदा पोडिअम किंवा पहिल्या मजल्यावर दिले जाते. विकास नियंत्रण नियमावलीतच तशी तरतूद आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र प्रकल्पातील मनोरंजन मैदान तळमजल्यावरच असले पाहिजे. पहिल्या मजल्यावर मनोरंजन मैदान होऊ शकत नाही, असे राष्ट्रीय हरित लवाने स्पष्ट केल्यामुळे या विकासकांमध्ये खळबळ माजली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मुंबई : चेंबूरच्या टिळक नगरमधील इमारतीला भीषण आग

वांद्रे येथील कल्पतरु समूहाच्या मॅग्नस या प्रकल्पाबाबत सप्टेंबर महिन्यात दिलेल्या आदेशामुळे विकासक हैराण झाले आहेत. या आदेशात राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे की, मनोरंजन मैदान हे तळमजल्यावरच दिले पाहिजे. सदर मैदान हे मोकळे असले पाहिजे आणि त्यावर झाडांची लागवड करता आली पाहिजे. अशा पद्धतीने मनोरंजन मैदान उपलब्ध व्हावे, याबाबत राज्याच्या पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने खात्री करून घेतली पाहिजे. विकासकाने अशा रीतीने मनोरंजन मैदान देण्यास असमर्थता दर्शविली तर त्याची पूर्तता होईपर्यंत प्रकल्प होऊ देता कामा नये किंवा अन्य कुणाला विक्री करता कामा नये.

हेही वाचा- दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या प्रथमेशची मृत्युशी झुंज संपली ; केईएम रुग्णालयात शनिवारी निधन

राष्ट्रीय लवादाने आपल्या आदेशात, मुंबई महापालिका विरुद्ध कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २०१४मध्ये दिलेल्या आदेशाचा उल्लेख केला आहे. या आदेशातील ६४ ते ६७ परिच्छेदाचा उल्लेख करीत लवादाने म्हटले आहे की, उत्तुंग इमारतींसाठी असलेल्या तांत्रिक समितीची या मुद्द्यांच्या आधारे फेररचना करण्याची आवश्यकता आहे. मात्र, विकास नियंत्रण नियमावली व प्रोत्साहन २०१४मध्येच पोडिअमवर मनोरंजन मैदानाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश व विकास नियंत्रण नियमावली यामध्ये विरोधाभास आहे, असे नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे राज्य अध्यक्ष संदीप रुणवाल यांनी म्हटले आहे. याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी करावी, अशी मागणीही नरेडकोने केली आहे.

हेही वाचा- २०२१ च्या मालेगाव दंगलीप्रकरणी ३० जणांना उच्च न्यायालयाकडून जामीन

वांद्रे येथील कल्पतरु मॅग्नस प्रकल्पात विकासकाने संबंधित भूखंडावरील नव्हे तर अभिन्यासातील मनोरंजन मैदान पोडिअमऐवजी तळघरावरील गच्चीवर घेतले आहे. ते मोकळे मैदानच असावे लागते जेथे झाडांची लागवड करता येईल, याकडे या प्रकल्पातील एक रहिवासी अनिल थरथरे यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत कल्पतरु प्रॉपर्टीजचे पराग मुनोत यांनी म्हटले आहे की, या प्रकल्पाबाबत जी माहिती आहे ती चुकीची आहे. या प्रकल्पावर कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. याबाबत अधिक माहिती संबंधित अधिकारी देतील, असे त्यांनी सांगितले. परंतु कुणीही संपर्क केला नाही. मुनोत यांनीही पुन्हा प्रतिसाद दिला नाही.


Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There may not be an entertainment field on the podium explanation of national green arbitration mumbai print news dpj