मुंबई: बोगस बियाणे, खते विक्रेत्यांवर छापे टाकताना खासगी व्यक्तींची घेतलेली मदत यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी लक्ष्य झाले. सत्तार यांच्याच जिल्ह्यात बोगस बियाणांची विक्री होणे योग्य नसल्याचा टोला लगावत भाजपच्या मंत्र्यांनी सत्तारांबद्दल नाराजी व्यक्त केली.
खाजगी व्यक्ती छापे कसे टाकताच अशी विचारणा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तार यांना समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील बोगस बियाणे, खते विक्रेत्यांविरोधात मोहिम उघडत टाकलेल्या छाप्यांवरून कृषीमंत्री सत्तार अड़चणीत आले आहेत. यात काही खाजगी व्यक्ती तसेच सत्तार यांचे स्वीय सहाय्यकही सामील असल्याचे आणि त्यांनी दुकानदारांकडून पैसे मागितल्याच्या आरोपावरून विरोधकांनीही सत्तार यांना लक्ष्य केले आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान बोगस बियाणे आणि खतांबाबत चर्चा होत असतानाच सत्तार यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढ़वू नये यासाठी विभाग खबरदारी घेत असून त्यासाठीच बोगस बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली असून छापे टाकले जात आहेत.
बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असून सध्या विभागाकडून कठोर कारवाई सुरू करण्यात आल्याने आपल्याला बदनाम केले जात आहे. त्यासाठी खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत सत्तार यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तुमच्याच जिल्हयात बोगस बियाणे विक्री होत असून त्याकडे पण बघा असा टोला भाजपच्या एका मंत्र्यांने मारल्याचा अपवाद वगळता मंत्रिमंडळाने सत्तार यांच्या बोलण्याकडे कानाड़ोळा केला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र नाराजी व्यक्त करीत खाजगी व्यक्ती छापा कसे टाकतात अशी विचारणा सत्तार यांच्याकडे केली. त्यावर ते निरूत्तर झाल्याचे समजते. दरम्यान, बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.