प्रकाश जावडेकर यांची घोषणा; ‘ऑपरेशन डिजिटल बोर्ड’ मोहीम

महाराष्ट्रातील डिजिटल शाळांच्या मोहिमेचे अनुकरण करून केंद्रस्तरावरही येत्या काळात पंधरा हजार वर्ग डिजिटल करण्यात येतील. नववीपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत विविध ‘ऑपरेशन डिजिटल बोर्ड’ मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी केली.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शाळांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले असून या नामकरण समारंभात जावडेकर बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शाळांचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक, स्वरूप संपत, ‘सुलेखनकार’ अच्युत पालव, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा, आयुक्त विशाल सोळंकी, संचालक डॉ. सुनील मगर आदी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, ‘‘पूर्वी आवश्यक शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लॅक बोर्ड’ राबवण्यात आले होते. आता प्रत्येक वर्ग डिजिटल होण्यासाठी ‘ऑपरेशन डिजिटल बोर्ड’ राबण्यात येणार आहे. महाराष्ट्रात हजारो शाळा डिजिटल झाल्या त्याचे श्रेय शिक्षकांना आहे. शिक्षकांनी चळवळ सुरू केली, त्यामुळे शाळांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान अवलंबणे शक्य झाले. त्याचप्रमाणे परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागत नव्हता. परीक्षा घेण्यासाठी २५ राज्यांनी संमती दिली असून त्याबाबतचा कायदाही लवकरच अस्तित्वात येईल.’’

फडणवीस म्हणाले, ‘‘अटलजींनी नेहमीच विविध क्षेत्रांत सर्व पद्धतीने विकास करून देशाला दिशा दिली. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचा शुभारंभ म्हणजेच अटलजींना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. गेल्या चार वर्षांत शिक्षण विभागाने केलेल्या प्रगतीमुळे महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.’’

‘‘ हा अभ्यासक्रम आयसीएसई, सीबीएसई, आयबी या मंडळांप्रमाणे नसून हा अभ्यासक्रम वेगळा आहे,’’ असे तावडे यांनी सांगितले. ‘‘या शाळांमुळे राज्यातील शिक्षणाला वेगळी दिशा मिळेल,’’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Story img Loader