Changes in Platform Numbers of Dadar station : मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या दादर स्थानकावरील फलाट क्रमांक आता बदलणार आहेत. दादर स्थानकातून पश्चिम आणि मध्य मार्गावर लोकल धावते. दोन्ही मार्गांवरही समान फलाट क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ९ डिसेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने २७ सप्टेंबर रोजी एक्स पोस्टद्वारे दिली होती. आता ९ डिसेंबरची तारीख जवळ आली असल्याने आयत्यावेळी गोंधळ उडण्याआधी तुम्ही दादर स्थानकावर झालेले बदल जाणून घ्या आणि सर्वांना शेअर केला.
दादर स्थानकावर एकूण १५ फलाट आहेत. त्यापैकी ८ फलाट मध्य रेल्वे मार्गावर, तर ७ फलाट पश्चिम मार्गावर आहेत. दोन्ही मार्गांवर सारखेच क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. मुंबईत नव्याने आलेल्या प्रवाशांना दादर स्थानकातील मध्य आणि पश्चिम मार्गावरील फरक कळत नाही. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने फलाटांचे क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम मार्गावर १ ते ७ क्रमांक फलाट तसेच राहणार आहेत. तर, मध्य मार्गावरील १ ते ८ क्रमाकांच्या फलटांना ८ ते १४ असे क्रमांक देण्यात येणार आहेत.
सध्या दादर स्थानकावर फलाट क्रमांक एकच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे फलाट क्रमांक दोन सध्या बंद आहे. नव्या बदलामध्ये फलाट क्रमांक दोन उपलब्ध नसेल. त्यामुळे फलाट क्रमांक १ नव्या बदलानंतर फलाट क्रमांक ८ म्हणून ओळखला जाणार आहे. फलाट क्रमांक ३ हा ९, फलाट क्रमांक ४ हा १०, फलाट क्रमांक ५ हा ११, फलाट क्रमांक ६ हा १२, फलाट क्रमांक ७ हा १३ आणि फलाट क्रमांक ८ हा १४ म्हणून ओळखला जाणार आहे.
जुने फलाट क्रमांक | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
नवे फलाट क्रमांक | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | |
दरम्यान, फलाटांचे क्रमांक फक्त बदलण्यात येणार आहे. फलाटांच्या जागा बदलण्यात येणार नसल्याचीही नोंद प्रवाशांनी घ्यावी. ज्या ठिकाणाहून कल्याणच्या दिशेने लोकल धावतात तिथूनच लोकल धावणार आहेत, फक्त त्या फलाटाचा ओळख क्रमांक बदलणार आहे.