राज्यातील वीजटंचाईच्या झळांपासून मुंबई मुक्त असावी यासाठी मुंबईकरिता स्वतंत्र औष्णिक वीजनिर्मिती करण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी प्रस्ताव पाठवा, अशी सूचना राज्य सरकारने टाटा वीज कंपनीला केली आहे. त्याशिवाय मुंबईतील वीजयंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी दोन हजार मेगावॉट क्षमतेची वीजवाहिनी टाकली जाणार आहे. त्यामुळे मुंबईत वीजबिघाड निर्माण झाल्यास महावितरण कंपनीचा वीजपुरवठा तातडीने सुरू करणे शक्य होणार आहे.
मुंबईतील वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी आयलँडिंग यंत्रणा असून टाटा वीज कंपनीतील सुमारे १८०० मेगावॉट वीजनिर्मितीतून वीजपुरवठा सुरू राहतो. राज्यात वीजपुरवठय़ात बिघाड झाला, तरी मुंबईवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. पण गेल्या काही वर्षांत मुंबईची विजेची गरज वाढत असून ती अडीच ते तीन हजार मेगावॉटपर्यंत जाते. मात्र, मुंबईतील सध्याच्या वीजनिर्मिती क्षमतेवर अवलंबून राहिल्यास अडचण निर्माण होऊ शकते, हे गेल्या वर्षी झालेल्या बिघाडातून लक्षात आले. त्यासाठी तत्कालीन उर्जा सचिव अजय मेहता यांची समितीही नेमण्यात आली होती. मुंबईच्या गरजेच्या वेळी उच्चदाब वाहिनी (कॉरिडॉर) उपलब्ध नसल्याने महावितरणची वीज देता येत नाही. त्यामुळे आता वीज बिघाडाच्या वेळी किंवा मुंबईला जादा वीज लागेल, त्यावेळी ती महावितरणच्या जाळ्यातून उपलब्ध करून देण्यासाठी वीज वाहिनी उभारली जाणार आहे. तिची क्षमता सुमारे दोन हजार मेगावॉटची असेल व उभारणीचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

तिढा सोडवण्याचा प्रयत्न
*मुंबईत टाटा कंपनीच्या ट्रॉम्बे येथील वीजनिर्मिती केंद्रात युनिट सहामध्ये औष्णिक वीजनिर्मिती करण्याच्या पर्यायावरही विचार सुरु आहे.
*हा संच असून ऑइलवर वीजनिर्मिती केल्यास प्रतियुनिट आठ रुपये इतकी महागडी वीज मिळते. त्यामुळे ती खरेदी करण्यास कोणीही तयार नसते.
*अन्य इंधनावरही या संचात वीजनिर्मिती करण्याची क्षमता असून आयात कोळशाचा वापर करून वीजनिर्मिती केल्यास तीन ते साडेतीन रुपये दराने वीज उपलब्ध होऊ शकते.
*पण मुंबईत कोळशावर वीजनिर्मिती करण्यास पर्यावरण व अन्य मुद्दय़ांवर विरोध आहे. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी लवकरच पावले टाकली जाणार आहेत.
*कंपनीने कोळशावर वीजनिर्मितीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर राज्य सरकार विचार करेल, असे डॉ. बावनकुळे यांनी सांगितले.

Story img Loader