शिवसेनेच्या विरोधानंतर ज्येष्ठ गझल गायक गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्यात आला.  शिवसेनेच्या या भूमिकेवर काँग्रेससह आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरूवात केली पण या वादात आता गायक अभिजीत भट्टाचार्यानेही उडी घेतली आहे. कथित हिंदूत्त्ववादी राजकीय पक्ष फक्त स्वत:चा उद्देश साध्य करून घेण्यासाठी ओरडतात. पण, दहशतवादी देशातून येणाऱया अशा डेंग्यू आर्टिस्ट विरोधात कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही, असे वादग्रस्त ट्विट अभिजीतने केले आहे. इतकेच नाही तर, गानसम्राज्ञी लता मंगशेकर, रफी, नौशाद, जगजित सिंह या गानसम्राटांच्या भारतात दहशतवादी राष्ट्रातील हवाला कलाकार येथे येऊन अर्थाजन करतात याची लाज वाटते, अशी तोफ अभिजीतने डागली आहे. यांच्यासारखे(गुलाम अली) कव्वाल हे स्वत:च्या गुणवत्तेने नाही तर, पाकिस्तानी दलालांमुळे भारतात आले, असेही अभिजीतने ट्विटरवर म्हटले आहे.

अभिजीतच्या या ट्विटरप्रहारामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. अभिजीत नेहमी अशा वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत राहिले आहेत. याआधी त्यांनी ‘हिट अँड रन’ प्रकरणावरून सलमानची बाजू घेऊन ‘फुटपाथवर झोपणार तर कुत्र्याचेच मरण येणार’, असे ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. त्यावर बॉलीवूडसह सर्व स्तरांतून अभिजीतवर टीका होण्यास सुरूवात झाल्यानंतर त्यांने माफीनामाही सादर केला होता.

Story img Loader