हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थकारणाची नाडी आपल्या हातात ठेवणारे स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक रविवारी चक्क यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील पूर्वतयारी शिक्षणक्रमाची परीक्षा देण्यासाठी ठाण्यातील एका महाविद्यालयात अवतरले. ते पाहून त्यांच्यासमवेत परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या भुवया उंचावल्या.
फाटक यांचे शिक्षण आठवीपर्यंतच झालेले आहे. मात्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी शिक्षणक्रम आणि पदवी शिक्षणक्रमाचे पहिले वर्ष पूर्ण करून थेट बारावी पासची समकक्षता मिळविता येते.  या शिक्षणक्रमाच्या माध्यमातून आपली शैक्षणिक अर्हता वाढविण्यासाठी रवींद्र फाटक यांनी या शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. भविष्यातील राजकीय वाटचालीमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण अडचणीचे ठरू नये, यासाठी त्यांनी या शिक्षणक्रमामध्ये प्रवेश घेऊन अभ्यास सुरू केला असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ठाणे येथील कोपरी पाचपाखाडी भागातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते.