‘ड्रॉप बॉक्स’मधील तपशिलाच्या आधारे कंपन्यांच्या नावे बनावट लेटरहेडद्वारे धनादेश मिळवायचे आणि त्यानंतर खरेदी केलेल्या सोन्यापोटी धनादेशाद्वारे रक्कम वळती करून गंडा घालणाऱ्या दुकलीने तीन कंपन्यांच्या नावे फक्त सोने खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. खरेदी केलेल्या सोन्याचे पैसे मिळाल्याने ज्वेलर्स गप्प होते. कंपनीला आपण फसविले गेल्याचे खात्यातील वळत्या झालेल्या रकमेनंतरच कळून चुकले. या ज्वेलर्सकडील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही दुकली पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
या दुकलीची गुन्हय़ाची पद्धत अशी : एका मोबाइल कंपनीचे प्रतिनिधी असून आम्हाला अधिक ग्राहक मिळविण्यासाठी अन्य मोबाइल कंपन्यांच्या ग्राहकांचा तपशील हवा, असे त्यांनी ड्रॉप बॉक्समधून धनादेश गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यासाठी त्यांना ३०० ते ४०० रुपये दिले. गोळा केलेल्या सर्व धनादेशांच्या झेरॉक्स प्रती त्यांनी काढून घेतल्या. विविध रेल्वे स्थानकांवर असलेल्या ड्रॉप बॉक्समधून त्यांनी शेकडो तपशील मिळविला. बचत खाते असलेल्या ग्राहकांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. खासगी बँकांतील खात्यांचाही विचार केला नाही. मात्र राष्टीयीकृत आणि सहकारी बँकांमध्ये खाते असलेल्या कंपन्यांच्या चालू खात्याचा तपशील त्यांनी मिळविला. राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका आजही ग्राहकांना शाखेतच धनादेश पुस्तिका देतात, याची त्यांना कल्पना होती. त्यानंतर कंपनीची बनावट लेटरहेड, स्टॅम्प तयार केले. हुबेहूब सही करून संबंधित पत्र बँकेत देण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात देऊन होतकरू तरुणांना पाचारण केले. या दुकलीबाबत काहीही चौकशी न करणाऱ्या पाच ते दहा तरुणांची त्यांनी निवड केली. त्यापैकी एकाला लेटरहेड घेऊन बँकेत जाण्यास सांगितले. त्याआधी संबंधित कंपनीच्या चालू खात्यात किती बचत आहे, याची माहिती या दुकलीने मिळविली होती. धनादेश पुस्तिका गहाळ झाली आहे वा विनंती पत्र सापडत नाही, अशी कारणे देऊन बँकेत दूरध्वनी करून लेटरहेडवर विनंती पत्र शिपायामार्फत पाठवीत आहोत, असे सांगत.  
संबंधित कंपन्यांच्या खात्यात मोठी रक्कम असल्यामुळे सहकारी बँका फारशी खातरजमा करीत नाहीत, याची कल्पना असलेल्या या दुकलीच्या हातात त्यामुळे धनादेश पुस्तिका पडली. त्यानंतर ते ज्वेलर्सच्या दुकानात गेले. मात्र या दुकानाशेजारी संबंधित बँक असावी, अशी काळजी घेतली. कंपनीला अर्धा किलो सोने खरेदी करावयाचे आहे. मात्र त्यासाठी धनादेशाद्वारेच पैसे देऊ शकतो, असे या दुकलीने सांगितले. ज्वेलर्सचेही त्याच बँकेत खाते असल्याची खात्री झाल्यानंतर आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची तयारीही या दुकलीने दाखविली. ज्वेलर्सही तयार झाला. बँकेत जाऊन बनावट सही असलेला खरा धनादेश सादर केला. धनादेश खरा असल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनाही संशय आला नाही. त्यांनी संबंधित ज्वेलर्सच्या खात्यात रक्कम वळती करण्यास आक्षेप घेतला नाही. अशा रीतीने त्यांनी तीन कंपन्यांना तब्बल ३३ लाखांचा गंडा घातला.
तेजप्रसाद मिश्रा आणि सचिन मिश्रा हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. भोईवाडा, जुहू, कुर्ला पोलीस ठाणे तसेच पुण्यातील विश्रामबाग, कोथरूड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर आझाद मैदान, जोगेश्वरी आणि एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा