Mumbai Crime News : मुंबईतल्या मालाड भागात अशी एक घटना घडली आहे जी ऐकून हसू येईल आणि रागही येईल. एक चोरटा मालाड येथील एका घरात चोरी करण्यासाठी गेला तेव्हा त्याला मौल्यवान वस्तू किंवा पैसे असं काहीही मिळालं नाही. त्यावेळी त्याने घरात असलेल्या महिलेचं चुंबन घेतलं आणि तिथून पळ काढला. या घटनेबाबत सदर महिलेने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर या चोराला अटक करण्यात आली.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
चोरी करण्याच्या उद्देशाने मालाड या ठिकाणी एका महिलेच्या घरात चोर शिरला. ही महिला मालाड येथील कुरार भागात वास्तव्य करते. चोर आला, त्याने घरात काही चोरण्यासारखं मिळतंय का ते पाहिलं. पण त्याला काहीही मिळालं नाही. त्यामुळे त्याने घरात राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचं चुंबन घेतलं आणि पळ काढला. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ही घटना ३ जानेवारीला घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात या चोराला अटक केली आहे.
हे पण वाचा- शुश्रुषा करणाऱ्या महिलेकडून दागिन्यांची चोरी; महिला अटकेत; साडेआठ लाखांचे दागिने जप्त
कुरार पोलिसांनी काय सांगितलं?
या घटनेबाबत कुरार पोलिसांनी सांगितलं की ३८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. महिलेचा विनयभंग करणं, दरोड्याचा प्रयत्न या गुन्ह्यांखाली या चोराला अटक करण्यात आली आहे. सदर ३८ वर्षांची महिला घरात एकटीच होती. त्यावेळी चोर घरात आला आणि त्याने दरवाजा आतून बंद केला. तसंच त्याने महिलेला धाक दाखवला आणि घरातल्या मौल्यवान वस्तू, मोबाइल, रोख रक्कम तसंच एटीएम कार्ड घेऊन ये असं सांगितलं. मात्र महिलेने घरात कुठल्याही मौल्यवान वस्तू नाहीत असं सांगितलं. ज्यानंतर या चोराने महिलेचं चुंबन घेतलं आणि तिच्या घरातून पळ काढला. ही घटना एकदमच अचानक घडली. चोरी करायला आलेला चोर असं काहीतरी करेल असं त्या महिलेच्या ध्यानीमनीही नव्हतं.
३ जानेवारीच्या संध्याकाळीच चोराला अटक करण्यात आली
चोर पळून गेल्यानंतर सदर ३८ वर्षीय महिलेने कुरार पोलीस ठाण्यात संपर्क साधला. या चोराला अटक करण्यात आली असून, सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. तसंच हा चोर त्याच भागात राहतो जिथे महिला राहते, तो त्याच्या कुटुंबासह राहतो आणि बेरोजगार आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली. तसंच या चोराचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही असंही पोलिसांनी सांगितलं. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.