ट्रान्स हार्बर मार्गावर चालत्या गाडीत दरवाजात उभ्या असलेल्या आरती घोलपकर या महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्या प्रयत्नात त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हरीश ऊर्फ बाबुलाल राठोड या आरोपीला थेट मध्य प्रदेशापर्यंत माग घेत पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी रबाळे ते घणसोली या स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला आणि दोनच दिवसांनी उपचारांदरम्यान आरती यांचा मृत्यू झाला होता.
आरती घोलपकर संध्याकाळी कोपरखैरणे येथून ठाण्याला येत होत्या. घणसोली आणि रबाळे स्थानकांदरम्यान लोहमार्गाजवळ गवतात लपलेल्या एका व्यक्तीने दरवाजात उभ्या असलेल्या आरती यांची पर्स चोरण्यासाठी लोखंडी सळईने पर्सवर फटका मारला. मात्र तो फटका आरती यांना लागून तोल जाऊन त्या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार लागला. बरोबरच्या प्रवाशांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
रेल्वे पोलिसांनी आपल्या रेकॉर्डवर असलेल्या अशा प्रकारे बॅग चोरणाऱ्या आरोपींचा तपास सुरू केला. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, वाशी, कुर्ला आणि ठाणे रेल्वे पोलीस यांची आठ पथके तयार केली गेली. या तपासात हरीश हा गुन्ह्य़ाच्या दिवसापासूनच अचानक नाहीसा झाल्याचे व मध्य प्रदेशात आप्तांकडे गेल्याचे समजले. पोलिसांची पथके मध्य प्रदेशात गेली. हरीशने पहिल्यांदा त्यांना हुलकावणी दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता कटनीजवळील एका गावात आपल्या नातेवाईकांकडे तो असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत हरीशने गुन्हा कबूल केला.

Story img Loader