मुंबई: चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी परिसरात रविवारी पहाटे एका घराला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांच्या पार्थिवावर रात्री पोस्टल कॉलनी परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून गुप्ता कुटुंबीय सिद्धार्थ कॉलनी परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे या घटनेनंतर संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीवर दुःखाची अवकळा पसरली. दरम्यान, आगीत मृत्युमुखी पडलेल्या सात जणांच्या पार्थिवावर रविवारी रात्री ८ च्या पोस्टल कॉलनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा >>>Vandre East Assembly constituency : तिकीटवाटवरून मविआ व महायुतीत संघर्ष, उमेदवारांची वाणवा! कशी असतील राजकीय समीकरणं?.

दरम्यान सिध्दार्थ कॉलनी परिसरातील छेदीराम गुप्ता यांच्या घराला लागलेली आग विझविल्यानंतर काही अज्ञात व्यक्ती तेथे फिरत होत्या. त्यांनी दुर्घटनाग्रस्त घरात प्रवेश केला आणि घरातील कपाट तोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १२ ते १४ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी छेदीराम यांच्या मुलीने चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आगीच्या घटनेनंतर मृतांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी त्यांच्या मृत्यूचा दाखला तयार करण्यासाठी आधारकार्डची गरज होती. यावेळी छेदीराम याची मुलगी वंदना गुप्ता हिने तिच्या मुलीला दुर्घटनाग्रस्त घरातील कपाटामधील आधारकार्ड घेण्यासाठी पाठवले होते. यावेळी घरातील कपाटातील तिजोरी तोडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तत्काळ ही बाब वंदना यांना सांगितली. त्यामुळे त्याही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पाहणी करून सोमवारी चेंबूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीत घरातील कपाटात साडेचार लाख रुपये रोख आणि कुटुंबातील महिलांचे दहा ते बारा तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.