पीएचडी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे २१ एप्रिल रोजी होऊ घातलेली ‘पेट’ (पीएचडी प्रवेश परीक्षा) परीक्षा अवघ्या चार दिवसांवर आलेली असताना ती पुढे ढकलण्याचा विचार विद्यापीठ स्तरावर सुरू झाल्याने हजारो परीक्षार्थी हवालदिल झाले आहेत.
साधारणपणे दीड ते दोन हजार विद्यार्थी या परीक्षेला बसतात. ही परीक्षा पुढे का ढकलली जात आहे, याबाबत विद्यापीठ स्तरावर निरनिराळी कारणे दिली जात आहेत. यात बायोटेकची जीआरएफ परीक्षा ‘क्लॅश’ होण्यापासून संबंधित परीक्षेच्या सुधारित नियमांना मान्यता नाही, अशा अनेक कारणांची चर्चा आहे. परीक्षा चार दिवसांवर असताना हा घोळ सुरू झाल्याने परीक्षार्थी मात्र गोंधळून गेले आहेत.
या वर्षीच्या एमएससी, एमकॉम उत्तीर्णाना परीक्षेला बसण्याची संधी मिळावी, हे एक कारण यासाठी देण्यात येत आहे. कारण, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या पदव्युत्तर परीक्षा अनुक्रमे २ मे आणि ३० एप्रिलला संपत आहे. या परीक्षा झाल्यानंतर पेट परीक्षा घेतली जावी. जेणेकरून या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेपर्यंत थांबावे लागणार नाही, अशी सूचना अधिष्ठात्यांकडून आली आहे.
 दुसरे कारण म्हणजे २१ एप्रिललाच बायोटेकची ‘जीआरएफ’ परीक्षादेखील होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनीही पेट पुढे ढकलण्याची विनंती विद्यापीठाकडे केली आहे.
 या कारणाला परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनीही दुजोरा दिला, मात्र परीक्षा पुढे ढकलण्याबाबत अद्याप अधिकृतपणे निर्णय झाला नसल्याचा खुलासा केला. असे जरी असले तरी परीक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण तिसरेच असल्याची चर्चा आहे.ते म्हणजे विद्यापीठाचा गोंधळी कारभार! आतापर्यंत ही परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेतली जात होती. या वर्षीपासून ती विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त संशोधन केंद्रामार्फत घेतली जाणार आहे.
 म्हणजेच या परीक्षेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. नव्या व्यवस्थेत विद्यापीठाकडे केवळ प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी राहील. परीक्षा घेण्याची आणि उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्याची जबाबदारी संबंधित केंद्राची राहील. विकेंद्रीकरणाबाबतच्या या निर्णयाला विद्यापीठाने २७ फेब्रुवारीला झालेल्या विद्वत परिषदेत मान्यता घेतली. मात्र, या नव्या नियमावलीनुसार कुलगुरूंच्या नावे विशेष निर्देश (व्हीसीडी) काढणे अपेक्षित होते.
 विद्यापीठाच्या गोंधळी कारभारामुळे ते वेळेत काढले न गेल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागणार असल्याची चर्चा आहे.
लग्नानंतर हळद
हे म्हणजे लग्नानंतर हळद लावण्याचा प्रकार असल्याची टीका ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे संतोष गांगुर्डे यांनी केली. ‘परीक्षा अवघी चार दिवसांवर आलेली असताना आणि परीक्षार्थीची मानसिक तयारी झालेली असताना वेगवेगळी कारणे देत ती पुढे ढकलण्याचा विचार होणे हा विद्यापीठाच्या गोंधळी कारभाराचा नमुना आहे. एकतर वर्षांला दोन वेळा ही परीक्षा होणे आवश्यक आहे, पण विद्यापीठ ती वर्षांतून एकदाच घेते. त्यातही जाहीर केलेली परीक्षा आयत्यावेळी पुढे ढकलणे हा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशीच खेळ आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, ही परीक्षा वेळेतच घेतली जावी, अशी मागणी केली.

Story img Loader