मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत अकरावी प्रवेशासाठीच्या तिसऱ्या नियमित फेरीनुसार ‘तिसरी प्रवेश यादी’ आज (२२ जुलै) सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली. या यादीअंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील १ लाख ७० हजार ८६० जागांसाठी १ लाख ५३ हजार ८८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ५३ हजार ५४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तसेच १५ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे, ८ हजार ४३३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ७ हजार ३३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. तिसऱ्या नियमित फेरीअंतर्गत अर्ज केलेले १ लाख ८३४ विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

तिसऱ्या प्रवेश यादीनुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. तसेच, संस्थात्मक, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश यादी १९ जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर कोट्यातील प्रवेशही २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करून कोणते महाविद्यालय मिळाले, हे पाहता येईल. जर विद्यार्थ्याला मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा नसल्यास तो पुढील फेरीसाठी थांबू शकतो. मात्र, विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. तसेच, विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकात नमूद केलेल्या कालावधीत आपला प्रवेश निश्चित करावा. अन्यथा पुढील प्रवेश प्रक्रियेच्या https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

हेही वाचा…कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे गर्डर उभारले

तिसऱ्या नियमित फेरीअंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयात कला शाखेच्या २५ हजार ८२३ जागा उपलब्ध असून ४ हजार ३३२ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे. तसेच वाणिज्य शाखेच्या ८९ हजार ३७ जागा उपलब्ध असून ३१ हजार ५५८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विज्ञान शाखेच्या ५३ हजार ५२० जागा उपलब्ध असून १६ हजार ९१४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमासाठी २ हजार ४८० जागा उपलब्ध असून २५० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे.