मुंबई : आशियाई फिल्म फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा १२ ते १८ जानेवारी दरम्यान थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या महोत्सवाचे २० वे वर्ष असून या महोत्सवात निवडलेले चित्रपट मुंबईतील माहीम परिसरातील सिटीलाइट सिनेमा आणि कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात दाखवण्यात येणार आहेत.

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात आशियाई विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका या देशातील १२ चित्रपटांचा समावेश असणार आहे. तर, इराणमधील सात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांच्या स्पर्धा यावर्षी महोत्सवाचे आकर्षण असणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई : वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा

भारतीय चित्रपट विभागात मराठीसह, मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी भाषांमधील १२ चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये ‘आत्मपॅम्पलेट’, ‘या गोष्टीला नावच नाही’, ‘फॅमिली’, ‘डीप फ्रीझ’, ‘बिजया पोरे’, ‘हाऊस ऑफ कार्डस’, ‘एपिसोड १३’, ‘सेयुज सनधन’, ‘आरोह एक प्रितिभी’, ‘मिनी’, ‘विस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर’, ‘गोराई पाखरी’ या १२ चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर महोत्सवातील मराठी चित्रपट विभागात ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘टेरिटरी’, ‘स्थळ’ , ‘रघुवीर’, ‘स ला ते स ला ना ते’, ‘जित्राब’, ‘गिरकी’, ‘गाभ’, ‘मदार’ या नऊ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या महोत्सवात त्यांचे चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत. तर, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवादरम्यान चित्रपट प्रदर्शनासोबतच अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Story img Loader