बिगरकाँग्रेस आणि बिगर भाजपची ‘तिसरी आघाडी’ स्थापन करण्यावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी सांगलीतील मेळाव्यात भर दिला असला तरी सध्याच्या राजकीय रचनेत तिसऱ्या आघाडीला महाराष्ट्रात फारसे काही स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. १९७८ प्रमाणे शरद पवार यांनी काही वेगळी भूमिका घेतली तरच तिसरी आघाडी राज्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
मुलायमसिंह यादव तिसऱ्या आघाडीची आवश्यकता व्यक्त करताना उत्तर प्रदेश आणि बिहारप्रमाणेच महाराष्ट्राचा उल्लेख केला. राज्याच्या सध्याच्या राजकीय रचनेत तिसऱ्या आघाडीला फारसे काही भवितव्य नाही. २००९ मध्ये ‘रिडालोस’ ही तिसरी आघाडी उदयाला आली होती. पण ही आघाडी फारसा ठसा उमटवू शकली नाही. आंध्र प्रदेशमध्ये चिंरजिवीप्रमाणे महाराष्ट्रात ही तिसरी आघाडी काँगेसला फायदेशीर ठरली. राज्यात समाजवादी पार्टीची ताकद मर्यादित आहे. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांना फारसा जनाधार राहिलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका स्पष्ट नाही. शेकाप गेले काही वर्षे शिवसेनेबरोबर आहे. यामुळे छोटय़ा पक्षांची मोट बांधली तरी तिसऱ्या आघाडीची काही वेगळी छाप पडण्याची शक्यता कमी आहे.
सांगलीमध्ये मुलायमसिंह यांनी तिसऱ्या आघाडीवर भर देताना महाराष्ट्राने या आघाडीला ताकद द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीत सामील व्हावे, हा मुलायमसिंह यादव यांचा हेतू असल्याचे स्पष्ट होते. पवार हे काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज आहेत. विशेषत: राहुल गांधी यांच्याबद्दल पवार यांची नाराजी लपून राहिलेली नाही. राहुल गांधी यांची काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्यावर पवार यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया मार्मिक होती. यामुळेच मुलायमसिंह यांचा पवार यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न आहे.
१९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला होता. खऱ्या अर्थाने तो तिसऱ्या आघाडीचाच प्रयोग होता. शरद पवार पुन्हा तसा प्रयोग करतील का, याबाबत साशंकता आहे. पवार काँग्रेसवर नाराज असले तरी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात होईपर्यंत काही वेगळी भूमिका घेण्याची शक्यता नाही. त्यातच तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्यास राष्ट्रवादीला राज्यात फारसा फायदा होण्याची शक्यता कमी आहे. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीपर्यंत साथ सोडण्याची शक्यता नाही. लोकसभेच्या निकालानंतर पवार हे निर्णायक भूमिका घेतील, असा राष्ट्रवादीतील नेत्यांचा अंदाज आहे.