मुंबई : मुंबई महानगरपालिकेने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील लहान-मोठे, तसेच मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे अडथळामुक्त करण्याचा संकल्प केला असून अनेक महिन्यांपासून धूळखात उभी असलेली वाहने, अस्ताव्यस्त पडलेले विविध प्रकारचे भंगार साहित्य, बांधकाम सामग्री हटविण्यासाठी तीन संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मुंबईमधील अनेक लहान-मोठ्या, तसेच मुख्य रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करण्यात येतात. ही वाहने अनेक महिने ‘जैसे थे’च असतात. त्यावर धूळ साचते आणि अनेक दिवस संबंधित वाहने एकाच जागी उभी असल्याचे लक्षात येते. कालांतराने ही वाहने वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी अडथळा बनतात. त्याचबरोबर पावसाळ्यात या वाहनांमध्ये डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात आणि डासांमुळे आसपासच्या परिसरात आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर अनेक वेळा धातू स्वरुपातील भंगार, अनधिकृत बांधकाम सामग्री (ताडकामकचरा वगळून) रस्त्यावरच फेकून दिले जाते. त्याचाही वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा होतो.

आणखी वाचा-पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा

आतापर्यंत रस्त्यावरील बेवारस अथवा एकाच ठिकाणी अनेक दिवस उभे केलेल्या, धूळ साचून खराब झालेल्या वाहनांवर महापालिकेच्या विभाग कार्यालयांच्या स्तरावर कारवाई करण्यात येत होती. या वाहनांवर नोटीस चिकटविण्यात येत होती. संबंधित वाहनमालक न आल्यास वाहन उचलून नेण्यात येत होते. मुंबईत व्यापक स्वरुपात ही कारवाई करून अनेक वाहने ताब्यात घेतली होती. परंतु ही वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी होती. आता विभाग पातळीवर ही कारवाई करण्याऐवजी शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरांसाठी स्वतंत्र तीन संस्थांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला.

नियुक्त करण्यात येणाऱ्या संस्थांना रस्त्यांवरील बेवारस वाहने, अनधिकृत बांधकाम सामग्री धातूसदृश्य भंगाराची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी लागणार आहे. या कामाबाबतची सर्व प्रक्रिया या संस्थांनाच करावी लागणार आहे. -भूषण गगराणी, आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका

Story img Loader