सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे तिसरे सत्र. सर्वप्रथम हरिश तिवारी यांचे गायन झाले. सादरीकरणासाठी त्यांनी राग मुलतानी निवडला. ‘गोकुल गाँव का छोरा’ ही पं. भीमसेनजींनी अजरामर करून ठेवलेली बंदिश अत्यंत प्रभावीपणे सादर केली. अत्यंत धीरगंभीर व्यक्तिमत्त्व. स्वरांवर उत्तम प्रभुत्व. पं. भीमनसेनजींविषयी नितांत आदर असल्यामुळे ग्वाल्हेर घराण्याचा अभ्यास असूनही पं. भीमसेनजींचे ते शिष्य झाले. त्यांची गायकी एवढी आत्मसात केली, की त्यांचे गायन ऐकल्यावर वाटते की पंडितजी स्वत:च गात आहेत. अथवा त्यांची ध्वनिमुद्रिका लागली आहे. एवढी गुरूशी समरसता आजवर पाहिली नाही. अगदी ‘तृण अग्निमेळे समरस झाले’ या ओवीनुसार आवाजाची फिरक उत्तम. लयकारी उत्तम. यानंतर मध्य त्रितालात ‘संगत मुरलीया मोरी रे’ ही मुलतानीमधील चीज वेगवान, दोन दोन आवर्तनाच्या ताना दमसास दाखवित होत्या. यानंतर मिश्र खमाज रागामधील ठुमरी ‘नाही बने गिरधारी’ ही ठुमरी दीपचंदी तालात मोठय़ा नजाकतीने सादर केली. ‘रघुकूल तुमको मेरी लाज’ या भावपूर्ण अभंगाने त्यांनी आपले दर्जेदार गायन थांबविले. त्यांना स्वरसंवादिनीवर अविनाश दिघे, तबल्यावर विनोद लेले, श्रुतींवर- वैष्णवी अवधानी, राजश्री महाजन या होत्या.
स्वरसोहळ्याचे दुसरे पुष्प गुंफण्याच्या मानकरी होत्या इंद्राणी मुखर्जी. बनारस घराण्याच्या या गायिकेने सादरीकरणासाठी राग यमन मधील ‘मोरी नैया पार करो’ ही विलंबित एकतालामधील बंदिश मोठी दाद देऊन गेली. प्रसिद्ध स्वरसंवादिनी वादक स्व. पं. गोविंदराव टेंबे म्हणत ‘संपूर्ण राग हा आलापांनी खुलविता आला पाहिजे.’ त्यानुसार प्रत्येक जण हे वाक्य जाहीरपणे म्हणतो, पण व्यासपीठावर गायला बसला, की २-३ आवर्तनातच हे आलापाचे अवधान कधी गळून पडते ते त्यालाच समजत नाही आणि ‘तानबाजी’ जी वेग घेते ती गायन थांबेपर्यंत. ही गुणी गायिका यास निश्चितच अपवाद होती. यमन राग आलापानी अतिशय सुरेख खुलविला.
आलापांमध्ये खरे सौंदर्य असते हे या गायिकेने श्रोत्यांना दाखवून दिले. ‘गणपती गजानन देवा’ ही मध्यलय त्रितालामधील यमनाची चीज अतिशय आकर्षकपणे मांडली. यानंतर खमाज दादरा भावपूर्ण सादर केला. नजाकत अदाकारी काव्यामधील अर्थानुरूप लडिवाळ भाव मोठय़ा कसबीने सादर केला. शेवटी ‘पूर्वी दादराही’ याच आकर्षक पद्धतीने सादर केला व गायन थांबविले. तबलासाथ- पं. रामदास पळसुले, स्वरसंवादिनीवर मिलिंद कुलकर्णी, तानपुरा- लीला वैद्य, आभा पुरोहित या होत्या.
आजचे विशेष आकर्षण म्हणजे पं. प्रवीण गोडखिंडी यांची बासरी व पं. आर. कुमरेश यांचे व्हायोलिन यांची जुगलबंदी. तबलासाथ पं. रामदास पळसुले तर पखवाजावर- पं. अर्जुनकुमार. सादरीकरणासाठी त्यांनी राग: दाक्षिणात्य प्रांतातला ‘बसंता’ ज्यामध्ये पंचम वर्ज होता. बासरीची फुंकर, उत्तम होती, दमसासही हिंदुस्थानी संगीतामधील ‘शुद्धबसत’ (ज्यामध्ये शुद्ध धैवत लावला जाते तो) सदृश वाटत होता. आलाप व तानांचे जे डिझाइन असते ज्याला नक्षीकाम म्हणू, ते कल्पकतेचे विशेष देणे लाभल्यामुळे अप्रतिम होते. दक्षिणी पखवाज आणि व्हायोलिन असा द्रविड वाद्यवृंद खूपच मोठी दाद घेऊन गेला.
त्यांनी यानंतर दाक्षिणात्य हेमावती रागही सुरेखपणे मांडला. मध्यम तीव्र व कोमल निषादमुळे मधुवंतीचे सूरही हृदयाला भिडत होते. तंतकारी, सवाल-जवाब आणि तबला-पखवाज यांचे मिश्रणातून जे वादन झाले ते श्रोत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
यानंतर स्वरमंचावर पं. राजा काळे यांचे गायन झाले. तबला- माधव मोडक तर स्वरसंवादिनीवर- सुयोग कुंडलकर, तानपुऱ्यावर बाळ अंबर्डेकर व श्याम जोशी होते. सर्वप्रथम भूप हा झुमरा तालामधील ख्याल सादरीकरणासाठी निवडला. रागांचा राजा म्हणजे भूप. सायंकालीन राग. रागाची बढत किती सुंदर विविधतेने नटविता येते हे या ‘स्वरराजाने’ दाखवून दिले. पूर्वाग प्रधान या रागाचे वैशिष्टय़ खूप छान सादर केले. याच रागातील ‘मेरी आज मंगल गावो’ ही पारंपरिक मध्य तीन तालामधील चीज खूप रंगली.
पं. माधव मोडक यांनी द्रुत तीनतालामधील ‘अनाघाताचे किसमे’ खूपच नावीन्यपूर्ण सुंदर वाजविले. द्रुत तीनतालामधील एका चीजेनंतर हमीर रागामधील झपतालामधील एक बंदिश सादर केली. या रागामधील द्रुत एकतालामधील ‘चंचल चपल’ चीज सादर केली. आपल्या गायनाची सांगता ‘शरनी तुम्हारी फेसवा’ या भजनाने केली. खूप भावस्पर्शी हृदयाला भिडणारे असे हे भजन होते.
या स्वरसोहळ्याचे अंतिम पुष्प मालिनी राजूरकर यांनी गुंफले. ख्याल नारायणी या अनवट रागामध्ये ‘बमना रे बिचार’ ही बंदिश सादर केली. नेहमीप्रमाणेच अतिशय धीम्या गतीने गायन रागाचे विविध पदर उलगडून दाखवित होत्या. शेवटी द्रुत त्रितालामध्ये याच रागामधील ‘सेहेलिया गावोरी आज।’ खूपच सुंदर गायिल्या. कार्यक्रमाचा शेवट मालिनीताईंनी भावपूर्ण केला व आजचे हे सत्र संपले.
शशिकांत चिंचोरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा