मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीनंतरही मुंबई महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोटय़ातील एकूण १ लाख ४७ हजार ८१४ (३८.३० टक्के) जागा रिक्त आहेत. तर, अद्याप अर्ज केलेल्या जवळपास ४५ हजार ५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरुवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.
तिसऱ्या विशेष फेरीसाठी नवीन नोंदणी, अर्जात बदल, कागदपत्रांची पडताळणी, महाविद्यालयांचे पसंतीक्रम रविवार, ६ ऑगस्ट ते मंगळवार, ८ ऑगस्ट (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत करता येणार आहेत. तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवार, १० ऑगस्ट (सकाळी १० वाजल्यापासून) ते शनिवार, १२ ऑगस्ट (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. तर कोटय़ांतर्गत व द्विलक्षी अभ्यासक्रमांचे प्रवेश याच कालावधीत होणार आहेत.