मुंबई : तेरा वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिळे अन्न दिल्याच्या आरोपातून महानगरदंडाधिकाऱयाने अन्न पुरवठादाराची निर्दोष सुटका केली आहे.दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी आठवडाभर, २५ फेब्रुवारी २००९ रोजी विक्रोळी-पार्कसाइट येथील महापालिकेच्या शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी गुलाबजाम, समोसा आणि चिकन बिर्याणीचा बेत ठेवण्यात आला होता. समारंभ संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. निरोप समारंभात सहभागी झालेले ४० विद्यार्थी आजारी पडले. त्यातील १९ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. विद्यार्थ्यांनी शिळे अन्न खाल्याने विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले.
निरोप समारंभासाठी जेवण पुरवणाऱ्या पूरवठादरविरोधात विषबाधा झालेल्यांपैकी एका विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली. आरोपीवर हानीकारक अन्न किंवा पेय विक्री करणे आणि जीव धोक्यात घालणे असे आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला. साक्षीदारांचे जबाब आणि रासायनिक विश्लेषण अहवाल हा मुख्य पुरावा म्हणून आधारभूत ठेवून पोलिसांनी आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले. आरोप मान्य नसल्याचे पुरवठादाराने सांगितल्यावर त्याच्यावर खटला चालवण्यात आला.
हेही वाचा : संतापजनक! गपणती मंडप उभारण्यावरुन मुंबईत मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला मारहाण
खटल्याच्या सुनावणीदरम्यान, पार्कसाइट पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये पंच साक्षीदार असलेल्या व्यक्तीची या खटल्यातही पंच म्हणून स्वाक्षरी घेण्यात आल्याची बाब महानगरदंडाधिकाऱयांच्या निदर्शनास आली. त्यामुळे हा पोलिसांचा साक्षीदार असून त्याच्या साक्षीवर अवलंबून राहू शकत नाही, असे महानगरदंडाधिकाऱयांनी नमूद केले.
हेही वाचा : भ्रष्टाचाराच्या आरोपांतून माजी एटीएस अधिकाऱ्याची निर्दोष सुटका ; उच्च न्यायालयाचा निकाल
पंचनाम्यावरून तो घटनेच्या दुसऱया दिवशी घेण्यात आल्याचे दिसून येते. शिवाय न्यायवैद्यक चाचणीसाठी अन्नाचे घेतलेले नमुने २४ तासांनंतर साहजिकच शिळे झाले. तसेच रासायनिक विश्लेषण अहवाल तयार करताना अन्न हानिकारक आणि वापरासाठी अयोग्य होते हे तपासण्यात आलेले नाही. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करणाऱया डॉक्टरांनाही साक्षीसाठी पाचारण करण्यात आले नाही. या सगळ्यांचा आरोपीला फायदा झाला असून पुराव्यांअभावी तो त्याच्यावरील सगळ्या आरोपांतून निर्दोष सुटका होण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले.