मुंबई : पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्गाच्या (एस व्ही रोड) रुंदीकरणात अडथळा ठरणारी कांदिवली परिसरातील ३० दुकाने महानगरपालिकेने हटवली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आर / दक्षिण विभागाच्यावतीने मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटून येत्या काळात वाहनधारकांना दिलासा मिळू शकेल.
पश्चिम उपगनरात वांद्रे येथून ते थेट बोरिवलीपर्यंत जाणारा एस व्ही रोड हा मुंबईतील एक अत्यंत महत्वाचा असा मार्ग आहे. मात्र हा मार्ग अरुंद असल्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होते. मुंबई शहरातून उपनगरात जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. एस व्ही रोडची जास्तीत जास्त रुंदी ही ९० फूट आहे. मात्र गोरेगाव ते कांदिवली या परिसरात या मार्गावर अनेक ठिकाणी बांधकामे असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. टप्प्याटप्प्याने ही बांधकामे हटवली जात आहेत. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सुमारे साडेतीनशे बांधकामे या रुंदीकरणाच्या आड येत होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी करणारे चिंचोळे भाग (बॉटल नेक) आहेत. ते सर्व भाग मोकळे करण्याचे काम पालिका प्रशासनातर्फे सुरू आहे. त्याअंतर्गत मंगळवारी कांदिवलीत कारवाई करण्यात आली.परिमंडळ सातच्या उपआयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, आर दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त मनीष साळवे यांच्या नेतृत्वात ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
स्वामी विवेकानंद मार्गाच्या (एस. व्ही. रोड) रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बांधकाम धारकांची पात्रता निश्चित करुन स्वामी विवेकानंद मार्ग, पोईसर मशीदजवळील ३० दुकाने, गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. परिणामी स्वामी विवेकानंद मार्गावरील वाहतूक कोंडी सुटून वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. या कारवाईसाठी ५० मनुष्यबळासह २ जेसीबी व २ डंपर तैनात करण्यात आले होते. तसेच पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.