मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त मिठाई, खवा, पनीर तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामेवा आदी खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रेत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागरिकांना सकस, भेसळमुक्त व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन नेहमीच कार्यरत असते. दिवाळीनिमित्त मिठाई, मावा उत्पादक व वितरकांनी ग्राहकांना दर्जेदार ताजी व सकस मिठाईची विक्री करावी, अन्न विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांना कोणती खबरदारी घ्यावी, तसेच परवाना अटींचे उल्लंघन करू नये याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न व्यवसायिकांना सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी बैठका व कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दिवाळीत खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मिठाई, फरसाण, ड्रायफ्रूटच्या उत्पादकांपासून ते किरकोळ विक्रेत्या दुकानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिला आहे.

हेही वाचा…धनेश पक्ष्यांची सुटका, बँकॉकहून तस्करी केलेले पक्षी सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात

ग्राहकांना एफडीएचे आवाहन

ग्राहकांनी वेष्टनावर बॅच क्रमांक, लॉट क्रमांक, खाद्यपदार्थ वापरण्याची मुदत, उत्पादन दिनांक, अन्न नोंदणी क्रमांक, अन्न परवाना क्रमांक इत्यादी तपासूनच अन्नपदार्थ खरेदी करावे. त्याबाबतची देयके घ्यावी, जेणेकरून फसवणूक होणार नाही. खाद्यपदार्थांवर अशा स्वरूपाची माहिती नसल्यास पदार्थ खरेदी करणे टाळावे. मिठाई खरेदी केल्यानंतर ती लवकर संपवावी. मिठाई ताजी व सकस आहे याची खातरजमा करावी. मावा अथवा खवा दर्जेदार वापरला जात नसल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ एफडीएशी संपर्क साधावा.
गुणवत्तेबाबत कोठे तक्रार कराल

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा आहे. कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत तक्रार असल्यास त्याबाबत १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर सविस्तर तक्रार नोंदवावी.
अन्न व्यवसायिकांना एफडीएकडून सूचना.

हेही वाचा…ट्वीटद्वारे १० विमानांमध्ये बॉम्बची धमकी, सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, विमान धमकीप्रकरणी १० वा गुन्हा

मिठाई उत्पादक, विक्रेते यांनी अन्नपदार्थ तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवावी, पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. कच्चा माल परवानाधारक व्यावसायिकांकडून खरेदी करावा, भांडी स्वच्छ व झाकणबंद असावीत. अन्नपदार्थ स्वच्छ, सुरक्षित ठिकाणी व जाळीदार झाकणाने झाकूण ठेवावी, कामगारांना त्वचा व संसर्गजन्य आजार झालेला नसावा, कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, मिठाईसाठी फुड ग्रेड खाद्यरंगाचाच १०० पी.पी.एम.चा मर्यादित वापर करावा. दुग्धजन्य पदार्थाच्या मिठाईचे सेवन त्वरित करण्याबाबत ग्राहकांना निर्देश द्यावे, खाद्यतेलाचा तळण्यासाठी पुनर्वापर करू नये, स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणून करू नये.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This diwali the fda will conduct a special drive to inspect food products mumbai print news sud 02