मुंबई : देशातील इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू होती. त्याला विरोध करण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांची पत्रकार परिषद घेऊन चढाओढ सुरू होती. त्याच वेळी जालनात मराठा आंदोलन करणाऱ्या बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार सुरू केला होता; पण त्याबद्दल बोलण्यास एकाही मंत्र्याला किंवा नेत्याला वेळ नव्हता. या आंदोलनाची माहितीच या सरकारजवळ नव्हती. हे सरकार ‘एक फुल, दोन हाफ’ नेत्यांचे आहे, असा टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
बारसु येथील आंदोलकांवर आधी लाठीमार झाला. नंतर वारकऱ्यांवर आणि आता मराठा आंदोलकांवर लाठीमार केला गेला आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला. तालुका प्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी जालन्यातील घटनेवरून शिंदे सरकारवर टीका केली. चाय पे चर्चा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी (भाजपने) सत्ता काबीज केली. आता आपण होऊ दे चर्चा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीची पोलखोल करू या, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> फेरविचार, क्युरेटिव्ह याचिकांच्या कारणास्तव मराठा आरक्षणासाठी दोन वर्षे वाया
जालना येथे झालेला लाठीमार हा कोणाच्या तरी आदेशाशिवाय पोलीस करू शकत नाहीत. ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम तेथे आयोजित करायचा होता; पण चर्चा करण्यासाठी कोणी गेले नाही. ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम म्हणजे ‘सरकार आपल्या दारी आणि थापा मारी भारी’ असा आहे. महाराष्ट्र आता तापला आहे. अशा वेळी जमिनीची मशागत करण्याची ही खरी वेळ आहे, असे सांगून ठाकरे यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.
हेही वाचा >>> मराठवाडा अचानक कसा पेटला?
गणेशोत्सव काळात संसदेचे अधिवेशन बोलविण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे यांनी हे अधिवेशन पितृपक्षात घेण्याचा सल्ला दिला. विशेष अधिवेशन बोलवून मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी समाजाला वटहुकूम काढून आरक्षण दिल्यास आमचा या अधिवेशनाला पाठिंबा राहणार आहे. ठाकरे सरकारचे काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुमलेबाजी शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन सांगायला हवी, असे त्यांनी सांगितले. भाजप म्हणजे ‘भाडय़ाने जमवलेली पार्टी’ असे नवीन नामकरण भाजपचे ठाकरे यांनी केले.